कर्नाटकच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता डी.के.शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (३० मे) डी.के.शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, आता डी.के.शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून येत्या ३ जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता नव्या मंत्रिमंडळात नेमकं कोणाचा समावेश होतो? याकडे कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागलं आहेत. या संदर्भातील माहिती काँग्रेसचे नेते के.सी.वेणुगोपाल यांनी दिली आहे.
डी.के.शिवकुमार शपथ कधी घेणार?
डी.के.शिवकुमार यांची आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता डी.के.शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा ३ जून रोजी बंगळुरू येथील लोकभवनात पार पडणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगण्यात येत आहे.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Congress CLP meeting concludes at Vidhana Soudha
— ANI (@ANI) May 30, 2026
As per the Karnataka Congress, the first resolution by Siddaramaiah stated that the Congress leadership would decide on the new CLP leader. Dr Parameshwara seconded it, and the CLP passed it… pic.twitter.com/kxf7htJYBH
दरम्यान, कर्नाटक काँग्रेस पक्षाच्या म्हणण्यानुसार, सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला नवीन विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवण्याचा अधिकार देणारा ठराव मांडला. त्या ठरावाला डॉ.जी.परमेश्वर यांनी अनुमोदन दिलं. त्यानुसार सर्व आमदारांनी डी.के.शिवकुमार यांची एकमताने काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली. या बैठकीला के.सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Congress general secretary (organisation) KC Venugopal says, "Now, he (DK Shivakumar) is going to Raj Bhavan to stake claim as Chief Minister, and he will be sworn in as Chief Minister on the evening of June 3rd with his team."
— ANI (@ANI) May 30, 2026
"Everyone thought… https://t.co/LgVdcNMISm pic.twitter.com/BeqYTHl3Gu
के.सी.वेणुगोपाल यांनी काय म्हटलं?
“आता ते (डी.के.शिवकुमार) मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी राजभवनात जात आहेत आणि ३ जून रोजी संध्याकाळी डी.के.शिवकुमार हे आपल्या काही सदस्यांसह मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. कर्नाटकातील हा बदल काँग्रेस पक्षासाठी एक समस्या ठरेल असं अनेकांना वाटत होतं . मात्र, आम्ही एक कुटुंब आहोत. काँग्रेस विधिमंडळ पक्ष गेल्या आठ वर्षांपासून मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी केलेल्या सेवेची एकमताने दखल घेत आहे. तो ठराव देखील खुद्द डी.के.शिवकुमार यांनीच मांडला होता. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचं अभिनंदन. आता काँग्रेस २०२८ मध्येही सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने कर्नाटकात पुन्हा सत्तेवर येईल”, असा विश्वास के.सी.वेणुगोपाल यांनी व्यक्त केला आहे.
