पीटीआय, बंगळूरु
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची शनिवारी एकमताने निवड करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शिवकुमार यांचा शपथविधी ३ जून रोजी दुपारी चार वाजता लोकभवन येथे होईल. यावेळी काही मंत्रीही शपथ घेतील.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांचे नाव सुचविले. तर ज्येष्ठ नेते जी.परमेश्वरा यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर ६४ वर्षीय शिवकुमार यांची निवड करण्यात आल्याचे काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांनी जाहीर केले. निवडीनंतर शिवकुमार यांनी लोकभवन येथे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. यावेळी सिद्धरामय्या व अन्य नेते उपस्थित होते.
विधान सौध येथील बैठकीला वेणुगोपाल यांच्यासह रणदीप सिंह सुरजेवाला निरीक्षक म्हणून उपस्थित होते. सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. परमेश्वरा यांनी त्याला अनुमोदन दिल्यावर अन्य आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर बैठक थांबवून दहा मिनिटे सिद्धरामय्या, वेणुगोपाल व सुरजेवाला यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. पक्षश्रेष्ठींशी या काळात चर्चा केल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या दालनातून परतल्यावर नवा नेता निवडीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली. नेता निवडीनंतर शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामकाजाचे कौतुक केले.
जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असून, विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केल्याबद्दल आभारी आहे.-डी. के. शिवकुमार, काँग्रेस नेेते
