नवी दिल्ली : डी. के. शिवकुमार बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकीकडे बंगळुरूमध्ये शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या रचनेबद्दल शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी लोक भवनच्या प्रांगणात दुपारी ४.०५ वाजता होणाऱ्या सोहळ्यामध्ये शिवकुमार आणि त्यांच्याबरोबर काही मोजके मंत्री यांचा शपथविधी होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर केला जाईल. या सोहळ्याला राहुल गांधी यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन मंत्रिमंडळाविषयी चर्चा केली. कर्नाटकच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ३४ सदस्यांचा समावेश होऊ शकतो. त्याचवेळी इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे संतुलित मंत्रिमंडळाची स्थापना हे शिवकुमार यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. मंत्रिमंडळात एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री असतील अशी शक्यता आहे.
सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे सोमवारपासून दिल्लीमध्ये आहेत. सोमवारी दोन्ही नेत्यांनी खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी सर्व नेत्यांची इंदिरा भवन या पक्ष मुख्यालयात एकत्रित बैठक झाली. यावेळी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे राज्याचे प्रभारी रणदीप सुरजेवाला हेही उपस्थित होते. संध्याकाळी उशिरा होणाऱ्या बैठकांमध्ये मंत्रिमंडळाला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चेहऱ्यांबरोबरच अनुभवालाही महत्त्व दिले जाईल. त्याशिवाय जातीय समीकरणे, प्रादेशिक संतुलन आणि निष्ठा या बाबीही तपासून पाहिल्या जातील.
दरम्यान, शिवकुमार यांनी आपल्या राजकीय प्रवासात गांधी कुटुंबीयांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि निरनिराळ्या वेळी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले.
