DK Shivakumar Oath Ceremony Updates : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर डी.के.शिवकुमार यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर अखेर आज ३ जून रोजी डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली
सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर डी.के.शिवकुमार यांची ३० मे रोजी कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. डी.के.शिवकुमार यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शिवकुमार यांना बंगळुरू मधील लोकभवनमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी?
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी.के.शिवकुमार यांनी शपथ घेतली. तसेच डी.के.शिवकुमार यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.परमेश्वर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जी.परमेश्वर यांना सिद्धरामय्या यांच्या जवळचा नेता म्हणून ओळखलं जातं.
प्रियांक खरगे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली
डी.के.शिवकुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून प्रियांक खरगे यांनी देखील शपथ घेतली आहे. प्रियांक खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आहेत. डी.के.शिवकुमार यांच्या सरकारमध्ये प्रियांक खरगे यांच्याकडे आता कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
सिद्धरामय्या यांच्या मुलाचा मंत्रिमंडळात समावेश
डी.के.शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांचाही समावेश करण्यात आला आहे. यतींद्र सिद्धरामय्या यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
डी.के.शिवकुमार यांच्यासह १३ जणांनी घेतली शपथ
बंगळूरमधील लोकभवनमध्ये आज शपधविधी सोहळा पार पडला. यावेळी डी.के.शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच डी.के.शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिद्धरामय्या यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश?
डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात जी.परमेश्वर, यतींद्र सिद्धरामय्या (सिद्धरामय्या यांचे पुत्र), प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र), के.एच.मुनियप्पा, के.जे.जॉर्ज, रामलिंगा रेड्डी, एम.बी.पाटील, सतीश जारकीहोळी, कृष्ण बायरेगौड़ा, यू.टी. खादर, ईश्वर खांद्रे, बायराथी सुरेश आणि शरणप्रकाश पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, शपथविधी पार पडल्यानंतर आता लवकरच खातेवाटप जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.
शपथविधी सोहळ्याला कोणाची उपस्थिती?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के.शिवकुमार यांनी बुधवारी हातात संविधानाची प्रत घेऊन कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. डी.के.शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
डी.के.शिवकुमार यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
१९८० मध्ये कनकपुरातील एका महाविद्यालयातून डी.के.शिवकुमार यांनी NSUI या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय आयुष्य सुरु केलं. १९८५ मध्ये डी.के.शिवकुमार यांनी त्यांची पहिली निवडणूक सातनूर विधानसभा मतदारसंघातून लढले होते. ही निवडणूक त्यांनी एच.डी.देवेगौडांच्या विरोधात लढवली होती. १९८८९ ला सातनूर विधानसभा मतदारसंघातूनच डी.के.शिवकुमार पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग आठवेळा ते आमदार झाले. १९९० ते १९९२ या कालावधीत ते तुरुंग प्रशासन मंत्री म्हणून शिवकुमार यांनी काम केलं. १९९९ ते २००४ ते कर्नाटकचे नगर विकास मंत्री होते. २०१९ मध्ये त्यांना निष्ठा सिद्ध करावी लागली. अनेक राजकीय चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. राजकीय चढ-उतार असतानाही त्यांनी पक्ष सोडला नाही. ही बाब विशेष. २०२० मध्ये त्यांना कर्नाटक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं. त्या काळात पक्ष कर्नाटकमध्ये बराच अडचणीचत आला होता. मात्र शिवकुमार यांनी संघटना पुन्हा उभी केली आणि २०२३ मध्ये विजय खेचून आणला. त्यावेळीच त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशा चर्चा होत्या. पण आता त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं आहे.
दरम्यान, डी.के.शिवकुमार हे वोक्कालिगा समाजातून येतात. कर्नाटकात वोक्कालिगा समाजाची लोकसंख्या १० टक्के आहे. २०२८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वोक्कालिगा समाज काँग्रेसच्या बाजूने असेल, यासाठी शिवकुमार प्रयत्न करतील. काही भाजपा नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार हे बंगळुरूतील एक यशस्वी उद्योजक आहेत.
कर्नाटकात काँग्रेसने नेतृत्व बदल का केला?
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी.के.शिवकुमार यांनी शपथ घेतली. डी.के.शिवकुमार हे त्यांच्या राजकीय कौशल्यासाठी आणि अडचणीच्या काळात धावून येणारे नेते म्हणून ओळखले जातात. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका २०२८ मध्ये होणार आहेत. तोपर्यंत सिद्धरामय्या यांचे वय ८० झालेले असेल. तसेच देशभरात भाजपाचा प्रभाव वाढत आहे. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे सिद्धरामय्या यांचा राजीनामा काँग्रेसने घेतला. भारताचा दक्षिणेकडील भाग वगळता भाजपाचे उत्तर, पूर्व व पश्चिम भारतावर वर्चस्व आहे. कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीचा विचार करून काँग्रेसने सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्याचे सांगितल्याचं बोललं जातं. तसेच २०२३ मध्ये विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत कर्नाटक काँग्रेसमध्ये एक अलिखित करार झाल्याची चर्चा होती. त्यानुसार शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देऊन तो करार पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ होती असंही बोललं जातं.
