DMK leader on Lord Ram: तमिळनाडूचा सत्ताधारी पक्ष द्रमुकच्या मंत्र्याकडून वादग्रस्त विधान करण्यात आले आहे आहे. प्रभू रामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, असे विधान तमिळनाडूचे मंत्री एसएस शिवशंकर यांनी शुक्रवारी केले. चेन्नईपासून नजीक असलेल्या अरीयलूर जिल्ह्यात चोल साम्राज्याचे पहिले राजे राजेंद्र यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केले. "राजेंद्र चोलन यांनी तलाव बांधल, मंदिरांचे निर्माण केले. चोल राजांचे नाव असलेले शिलालेख आणि हस्तलिखित दस्ताऐवज मिळालेले आहेत. पण प्रभू राम यांच्या अस्तित्वाबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा सापडत नाही", असे शिवशंकर म्हणाले. शिवशंकर यांनी पुढे सांगितले की, प्रभू रामाला लोक अवतार मानतात. अवतार हे जन्म घेत नाहीत. आपल्या इतिहासाची मोडतोड केली गेली आहे. आपला स्वतःचा इतिहास लपवून दुसराच इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे. द्रमुकच्या नेत्यांना आता चोल संस्कृतीची आठवण कशी? शिवशंकर यांच्या विधानानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी नाराजी व्यक्त केली. द्रमुक पक्षाला प्रभू रामाचा इतका तिटकारा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, डीएमकेने प्रभू श्रीरामाबद्दलचा उल्लेख आताच का काढला? द्रमुकच्या नेत्यांना मला आठवण करून द्यावी लागेल की, नवीन संसदेच्या इमारतीमध्ये जेव्हा चोल साम्राज्याचा सेंन्गोल ठेवला गेला, तेव्हा याच लोकांनी त्यास विरोध केला होता. तमिळनाडूचा इतिहास १९६७ पासून सुरू होतो, असे वाटणाऱ्या लोकांना आता देशाच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाबद्दल प्रेम वाटते. हे हास्यास्पद नाही का? हे वाचा >> विश्लेषण : काय आहे दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटात दाखवलेल्या चोल साम्राज्याचा इतिहास? जाणून घ्या याबरोबरच अण्णामलाई यांनी राज्याचे कायदा मंत्री रेगुपथी यांच्या आणखी एका विधानाचा दाखला दिला. भगवान राम हे द्रविड मॉडेलचे अग्रदूत आहेत, असे रेगुपथी म्हणाले होते. प्रभू रामाचा इतिहास थोपवला गेला एसएस शिवशंकर असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचे उदघाटन करताना सांगितले की, तीन हजार वर्षांपूर्वी प्रभू राम येथे राहत होते. पण प्रभू रामाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे हा इतिहास नाही. प्रभू रामाबाबतचे दावे करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. तमिळनाडूचा इतिहास दाबण्यासाठीच हे असे दावे केले जातात. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी या लोकांचे षडयंत्र आधीच ओळखले होते. हे ही वाचा >> उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..” द्रमुक नेत्यांकडून अनेकदा वादग्रस्त विधाने द्रमुकच्या नेत्यांनी याआधीही वादग्रस्त विधाने केलेली आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केली होती. त्यावरून बराज गजहब झाला होता. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्यामुळेच त्यांना नव्या संसद इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमास बोलावले गेले नाही, असेही उदयनिधी म्हणाले होते.