DMK Minister Periyakaruppan Tiruppattur Result : तामिळनाडूमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. सत्ताधारी डीएमकेची सत्ता जाऊन नव्याने आलेल्या टीव्हीके पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. महत्त्वाचं म्हणजे डीएमकेच्या एका उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. त्यामुळे एका मताचं मूल्य राजकारणात किती मोठं असू शकतं, हेच या निकालाने अधोरेखित केलें आहे.
राज्याचे सहकार मंत्री पेरियाकरुप्पन यांचा पराभव ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) चे उमेदवार श्रीनिवास सेथुपथी आर. यांनी केला. मतमोजणीनंतर सेथुपथी यांना एकूण ८३,३७५ मते मिळाली, तर पेरियाकरुप्पन यांचे केवळ एक मत कमी पडले. हा विजय अलीकडील निवडणूक इतिहासातील सर्वात अटीतटीच्या लढतींपैकी एक मानला जात आहे.
डीएमके तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष
तमिळनाडूतील सर्व २३४ जागांचे निकाल हाती आले असून, तमिळगा वेत्री कळघम (TVK) १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्याच्या राजकारणात हा एक मोठा बदल मानला जात आहे. सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) ५९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर अण्णा द्रमुक (AIADMK) ४७ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. याशिवाय काँग्रेसला (INC) ५ आणि पीमकेला (PMK) ४ जागा मिळाल्या आहेत. या निकालामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, टीव्हीके (TVK) आता सरकार स्थापनेत मुख्य भूमिका बजावणार आहे.

तमिळनाडूच्या २३४ सदस्यीय विधानसभेत ‘टीव्हीके’ सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते आणि सोमवारी मतमोजणी पार पडली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा त्यांच्या कोळथूर मतदारसंघात द्रमुकचे माजी आमदार व्ही. एस. बाबू यांनी ८,७९५ मतांच्या फरकाने पराभव केला. स्टॅलिन यांचा यापूर्वी १९९१ मध्ये पराभव झाला होता. उपमुख्यमंत्री उदयनिधी यांच्या मतदारसंघातही सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेर त्यांनी चेपॉक-तिरुवल्लिकेनी येथून विजय मिळवला.
तमिळनाडूच्या विधानसभा निवडणूक निकालांनी नटांना राजकारणात यश मिळत नाही, हा जुना समजही मोडीत काढला. थलपती विजय आता एन. टी. रामा राव, एम. जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांसारख्या दिग्गज अभिनेता-नेत्यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.
१५ मंत्र्यांचा पराभव
द्रमुक सरकारमधील ३४ पैकी १५ मंत्र्यांचा पराभव झाला. यामध्ये आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम, माहिती व तंत्रज्ञान मंत्री पीटीआर पलानीवेल थियागराजन, शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोझी, उद्योगमंत्री टीआरबी राजा, एस. एम. नसर आदी मंत्र्यांचाही यात समावेश आहे.
