DMK Murasoli attacks CM Vijay Joseph over Trisha Krishnan Independence Day salute: द्रमुक पक्षाचे नेते आणि तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा यांच्यावर द्व्यर्थी टिप्पणी केल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात वाद उद्भवला होता. हा वाद शमल्यानंतर द्रमुक पक्षाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री विजय जोसेफ आणि त्यांची मैत्रिण अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांना लक्ष्य केले आहे. ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अभिनेत्री त्रिशा यांना पहिल्या रांगेत बसण्यास स्थान दिल्याबद्दल द्रमुक पक्षाचे मुखपत्र ‘मुरासोली’मधून टीका करण्यात आली आहे.
फोर्ट सेंट जॉर्ज येथे भारताचा ८० स्वातंत्र्यदिन तमिळनाडू सरकारच्या वतीने साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी यावेळी ध्वजारोहण केले. तसेच मोटारीतून मैदानाला फेरी मारून त्यांनी उपस्थितांना आणि सुरक्षा दलाला अभिवादन केले. यावेळी मुख्य पाहुण्यांच्या रांगेत अभिनेत्री त्रिशा यांना पहिल्या रांगेत स्थान दिल्याचे पाहिले गेले. अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय जोसेफ हे एकमेकांना सॅल्यूट देताना दिसले.
‘टीव्हीकेच्या मतदारांनाही हे रुचले नसेल’
मुरासोलीच्या संपादकीयमधून यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. दोघांचे हे वर्तन अतिशय लज्जास्पद असल्याचे संपादकीयमधून म्हटले आहे. “स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली दिसली. कोणताही संकोच किंवा लज्जा न बाळगता त्यांनी एका अभिनेत्रीला पहिल्या रांगेत स्थान दिले. एकमेकांना त्यांनी सॅल्यूटही केला. हे दृश्य टीव्हीकेच्या मतदारांनाही आवडले नसेल”, अशी टीका या संपादकीयमधून करण्यात आली आहे.
तमिळनाडू सरकारच्या अधिकृत स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या कुटुंबीयांसह अभिनेत्री त्रिशा पुढे बसल्या होत्या. पिवळ्या साडीतील त्रिशा यांनी विजय जोसेफ यांना पाहून दिलेली सलामी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. त्रिशा यांचा हा फोटो आणि व्हिडीओ बराच व्हायरल झाला.
अभिनेत्री त्रिशा या शासकीय सोहळ्यात उपस्थित राहिल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मे महिन्यात झालेल्या शपथविधी सोहळ्यातही अभिनेत्री त्रिशा उपस्थित होत्या. काहीशा भावुक झालेल्या त्रिशा यांचे फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते. मुख्यमंत्री विजय जोसेफ आणि अभिनेत्री त्रिशा यांची मैत्री तमिळनाडूमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. निवडणुकीपूर्वीही काही नेत्यांनी त्यांच्यावर टिप्पणी करून वाद निर्माण केला होता. उदयनिधी यांच्या टिप्पणीनंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आहे.
विजय यांच्या कौटुंबिक जीवनात कलह
विजय जोसेफ यांची पत्नी संगीता यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी फेब्रुवारी २०२६ मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. घटस्फोटाच्या अर्जात विवाह संपविण्यासाठी त्यांनी मानसिक क्रूरता, भावनिक दुर्लक्ष, परित्याग आणि कथित व्याभिचार अशी कारणे दिली होती. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी अचानक आपला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विजय जोसेफ आणि त्रिशा यांच्या व्हायरल फोटोंनंतर द्रमुकला आयता विषय मिळाला. विजय जोसेफ आता मुख्यमंत्री झाले असून त्यांच्याकडून अशा लज्जास्पद वर्तनाचे समर्थन करण्यात येत आहे, असा आरोप या संपादकीयमधून करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला अभिनेत्रीला निमंत्रित करून तिला सलामी देणे, हे विजयचे चाहतेही स्वीकारणार नाहीत, असाही आरोप करण्यात आला.
