नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ हे मुस्लिमांना वगळून फक्त हिंदूसाठी लिहिले गेले गाणे होते, अशी टीका करून द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी सोमवारी लोकसभेतील ‘वंदे मातरम’च्या चर्चेत नवा वाद निर्माण केला. राजा यांनी ऐतिहासिक संदर्भ, धार्मिक तणाव आणि राजकीय व्याख्यांवर आधारित भाषणामध्ये पंतप्रधान मोदींच्या मुद्द्यांचा जोरदार प्रतिवाद केला.

ए. राजा यांनी आपल्या भाषणात १९०२मध्ये बंगालमध्ये स्थापन झालेल्या गुप्त क्रांतिकारी संघटनेचा, अनुशीलन समितीचा (बिप्लबी) उल्लेख केला. सशस्त्र संघर्षाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचा बिप्लबींचा उद्देश होता. ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गाण्याचा दर्जा देण्यासाठी सर्वात जोरकस मोहीम बिप्लबींकडूनच करण्यात आली. ब्रिटिशांनी जप्त केलेल्या दस्तऐवजांमध्ये असे दिसून आले की, बिप्लबी संघटनेत मुसलमानांना संघर्षकार्यात सहभागी होण्याची परवानगी नव्हती. संघटनेमध्ये प्रवेशावेळी घेतले जाणारे व्रत हिंदूंसाठी पवित्र होते, मुसलमानांसाठी नाही. यावरून ‘वंदे मातरम’ला धार्मिक अर्थ काय होता हे स्पष्ट होते, असे राजा म्हणाले.

पंतप्रधानांच्या विधानांमुळे चार प्रश्न उपस्थित झाले. ‘वंदे मातरम’चे तुकडे कोणी केले, ‘वंदे मातरम’मधील तुकड्यांमुळे देशाची फाळणी झाली का, आज फाळणीची बीजे कुठे अस्तित्वात असल्याचे दिसते आणि ही फाळणी अपेक्षित असलेल्यांच्या मनात ‘वंदे मातरम’चे स्वप्न काय आहे, अशी विचारणा राजा यांनी केली. ‘वंदे मातरम’ हे केवळ ब्रिटिशांच्या विरोधातच नव्हते, तर मुसलमानांच्या विरोधातही होते. काँग्रेस या आक्षेपांना उत्तर देत होता, तुकडे करत करत नव्हता. काही काँग्रेस सदस्यांच्या आग्रहावरून टागोरांनीही मत दिले. संपूर्ण कविता तिच्या मूळ संदर्भासह वाचल्यास ती मुसलमानांच्या भावना दुखावू शकते, असे टागोरांनी एका पत्रात म्हटले आहे, असा तपशील राजा यांनी दिला. ‘वंदे मातरम’चे स्वप्न काय होते, हे मला माहित नाही; पण पंतप्रधानांचे स्वप्न मात्र हिंदू राष्ट्र हेच आहे, असा आरोप राजा यांनी केला.

हिंदू-मुस्लीम संदर्भ

– १९०५–१९०८ दरम्यान बंगालमध्ये मशिदींमध्ये नमाज सुरू असताना हिंदू मिरवणुकांमध्ये ‘वंदे मातरम’च्या घोषणा

– १९०७मध्ये कोणत्याही मुसलमानाने ‘वंदे मातरम’ म्हणू नये आणि स्वदेशी चळवळीत सहभागी होऊ नये, असे लिहिलेल्या पत्रकांचे वाटप

– १९०२–१९१५दरम्यान अशा घटनांमध्ये वाढ- ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्येही या गाण्यामुळे वाढलेल्या सांप्रदायिक तणावावर चर्चा

– १९०५ मध्ये गांधीजींकडून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे कौतुक, १९४०मध्ये भूमिकेत बदल

– ‘वंदे मातरम’ धार्मिक आरोळी नसून राजकीय घोषणा, मुसलमानांचा अपमान किंवा त्यांना दुखवण्यासाठी त्याचा वापर न करण्याची गांधीजींची सूचना

‘भाजपचे पूर्वज दया याचिका करत होते!’

बंगाली भाषेत भाषण देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी भाजपवर टीका केली. ‘वंदे मातरम’ हे केवळ ‘भारताचे राष्ट्रीय गीत नाही तर स्वातंत्र्यलढ्याला चालना देण्यासाठी लाखो लोकांनी गायलेला एक वारसा आहे. आज सत्तेत असलेले लोक ही भावना समजून घेण्यात अपयशी ठरले आहेत, असे त्या म्हणाल्या. सावरकरांनी तुरुंगात असताना दया याचिका लिहिल्या आणि स्वतःचे स्वातंत्र्य मिळवले. त्यावेळी, सेल्युलर तुरुंगातील ५८५ कैद्यांपैकी ३९८ बंगालींनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न बाजूला ठेवून भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित केले. तरुण खुदीराम बोस यांनी आपले जीवन बलिदान दिले, पण, त्यावेळी आजच्या सत्ताधारी पक्षाचे पूर्वज दया याचिका लिहिण्यात व्यस्त होते, अशी टीका दस्तीदार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा उल्लेख ‘बंकिमदा’ असा केला. जसे की, ते या ज्येष्ठ साहित्यिकाबरोबर ते चहाच्या दुकानात गप्पा मारत होते. बंगाली लोक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना कमी लेखणे सहन करणार नाहीत. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची केलेली तोडफोड आणि अनादरही सहन केला नव्ता, याची आठवण दस्तीदार यांनी करून दिली. बंगालींना उभे राहून लढायचे कसे हे माहीत आहे. नेताजींनी ‘जय हिंद’ला लोकप्रिय केले. राष्ट्रगीत जन गण मन हे रवींद्रनाथ टागोरांनी रचले. त्यांच्या भाजप खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी अनादर केला. बंगाली लोकांमध्ये देशभक्तीची भावना खोलवर रुजलेली आहे. बंगालींचा असा अनादर ते कधीही सहन केला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा दस्तीदार यांनी घेतला.