नागपट्टीणम् जिल्ह्य़ात सन १९९५-९६ मध्ये स्मशानभूमी उभारणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी द्रमुकचे राज्यसभा सदस्य टी. एम. सेल्वागणपती व अन्य चौघांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सेल्वागणपती हे तामिळनाडूचे माजी मंत्रीही आहेत.
या प्रकरणी विशेष न्यायालयाच्या न्या. एस. मालती यांनी सेल्वागणपती, ग्रामीण विकास विभागाचे तत्कालीन विशेष आयुक्त एम. सत्यमूर्ती, ग्रामीण विकास विभागाचे विशेष संचालक एम. सत्यमूर्ती, संचालक एम. कृष्णमूर्ती, प्रकल्पाधिकारी टी. भारती या सर्वाना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अन्य आरोपी व सहकारी संस्था विभागाचे विशेष अधिकारी आरोग्य राय हे सुनावणीप्रसंगी मरण पावले.सेल्वागणपती हे तामिळनाडूचे ग्रामीण विकासमंत्री असताना त्यांच्याच कारकिर्दीत हा भ्रष्टाचार झाला. सन १९९५-९६ मध्ये जवाहर रोजगार नागापट्टीणम् भागात १०० स्मशानभूमी उभारण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामध्येच हा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला. या स्मशानभूमी उभारण्याचे कंत्राट सहकारी संस्थांना देण्याऐवजी खासगी कंपन्यांना देऊन त्यांना निधीही देण्यात आला.
 नंतर या स्मशानांची उभारणी योग्य प्रकारे न झाल्याचे उघडकीस आले. या एकूण प्रकरणी सरकारला २३ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे उघडकीस आले होते.