तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. पण १०८ जागा जिंकून देखील टीव्हीके पक्ष बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे आता विजय जोसेफ यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमदारांच्या संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागत आहे.
काँग्रेस पक्षाने टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे. मात्र, टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाने आज (६ मे) द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाबरोबर असलेली आघाडी तोडली आहे. त्यामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेमुळे डीएमके पक्षाचे नेते चांगलेच भडकले आहेत.
‘आम्हाला निष्ठेची मोठी किंमत मोजावी लागली, आमच्या पाठीत काँग्रेस पक्षाने खंजीर खुपसला’, अशी टीका डीएमकेच्या नेत्यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच डीएमकेच्या सर्वच नेत्यांनी काँग्रेसने विजय यांच्यासोबत केलेल्या युतीवरून नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
डीएमकेचे नेते टी.आर.बालू यांनी याबाबत बोलताना संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “तामिळनाडूमध्ये विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही सुख-दुःखात काँग्रेसच्या पाठीशी राहिलो. मात्र, काँग्रेसने ‘संधीसाधू’पणे भूमिका घेतली. जेव्हा काँग्रेस पक्ष संकटांना सामोर जात होतं, तेव्हा द्रमुक एक खंबीर मित्रपक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहिली. पण या निष्ठेची किंमत आता आम्ही मोजली आहे”, असं टी.आर.बालू यांनी म्हटलं आहे.
“पाठीत सुरा खुपसला”, टीव्हीकेसोबत जाणाऱ्या काँग्रेसवर द्रमुकचा आरोप
तमिळनाडूत काँग्रेस पक्षाने आज (६ मे) द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाबरोबर असलेली आघाडी तोडली आहे. काँग्रेस पक्ष विजय यांच्या पक्षाबरोबर सत्तेत सहभागी होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. तमिळनाडूच्या विधानसभेतील एकूण २३४ जागांपैकी विजय यांच्या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. तमिळनाडू विधानसभेची निवडणूक काँग्रेस व द्रमुकने एकत्रितपणे लढली होती.
विजय यांच्या टीव्हीके पक्षाबरोबर काँग्रेस नव्याने आघाडी करत आहे. “ही नवी आघाडी दोन्ही पक्षांच्या एकमेकांप्रति असलेल्या आदरावर, जागांच्या वाटपावर आणि वाटून घेतलेल्या जबाबदारीवर अवलंबून आहे. फक्त आताचे सरकार स्थापन करण्यासाठी ही आघाडी नसून भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांसाठी असेल”, असे तमिळनाडूचे काँग्रेस प्रभारी गिरीश छोडनकर यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. द्रमुकच्या प्रवक्त्याने काँग्रेसच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना “पाठीत सुरा खुपसल्याची” भावना व्यक्त केली. तामिळनाडूतील काँग्रेस व द्रमुकमध्ये मागील दोन दशकांपासून असलेल्या संबंधांना तडा गेला आहे.
