माजी केंद्रीय मंत्री आणि डीएमकेचे नेते एम. के. अलागिरी यांना शुक्रवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षप्रमुख आणि अलागिरी यांचे वडील एम. करुणानिधी यांनीच हा निर्णय घेतला. अलागिरी यांना पक्षाच्या सर्व पदावरून हटविण्यात आले असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षासोबत लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याविरोधात मत प्रदर्शन केल्यामुळे अलागिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयाविरोधात मत मांडण्यासाठी पक्षांतर्गत व्यासपीठ उपलब्ध असताना त्याचा वापर न करता थेटपणे सार्वजनिकरित्या विजयकांत यांच्यावर टीका केल्यामुळे अलागिरी यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पक्ष सचिव के. अनबाझागन यांनी स्पष्ट केले.