Madras High Court on Udhayanidhi Stalin: तामिळनाडू विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांना मद्रास उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. उदयनिधींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या भाषणावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. सनातन धर्माला उद्देशून केलेल्या भाषणाला न्यायालयाने ‘हेट स्पिच’ म्हटले आहे. २ सप्टेंबर २०२३ तामिळनाडू राज्यात आयोजित केलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर्स आर्टिस्ट्स असोसिएशन आयोजित ‘सनातन निर्मूलन परिषद’ नावाच्या परिषदेत स्टॅलिन यांनी दिलेल्या भाषणावरून वाद निर्माण झाला होता.

मद्रास उच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मासंबंधीच्या विधानांना द्वेशपूर्ण भाषण मानले आहे. न्यायालय म्हणाले की, अशा चिथावणीखोर वक्तव्यांमुळे सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी भाजपा नेते अमित मालवीय यांनी द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला होता. उदयनिधींच्या भाषणाचा व्हिडिओ तोडून-मोडून सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपांखाली मालवीय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिलेल्या निर्णयात मद्रास उच्च न्यायालयाने अमित मालवीय यांच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे.

“मालवीय यांच्याविरोधात केलेली कारवाई बेकायदेशीर”

द्रमुक नेते उदयनिधींच्या भाषणात द्वेशपूर्ण शब्द होते, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. न्यायालय म्हणाले, सनातन धर्माचे अनुयायी आणि भाजपा नेते अमित मालवीय यांनी सनातन धर्माचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेची कोणतीही तरतूद लागू होणार नाही. उदयनिधी यांच्या भाषणाचा अर्थ वंशसंहाराला चिथावणी देणारे भाषण असा लावला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायालय काय म्हणाले?

भाजपा नेते मालवीय यांनी उदयनिधींच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती आणि अशा प्रतिक्रिया देणाऱ्या विरोधात पोलीस कारवाई करणे हा कायद्याचा दुरुपयोग आहे. या कारवाईमुळे मालवीय यांना नुकसान आणि इजा होईल, असं न्यायालय म्हणाले. तसेच या प्रकरणात द्वेशपूर्ण भाषण देणाऱ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल न करता त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं सांगत न्यायालयाने नाराजी दर्शवली.

वाद का झाला होता?

२०२३ मध्ये प्रोग्रेसिव्ह रायटर्स आर्टिस्ट्स असोसिएशन आयोजित ‘सनातन निर्मूलन परिषद’ नावाच्या परिषदेत स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर विधाने केली होती. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, असं उदयनिधी म्हणाले होते. त्यानंतर उदयनिधी यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

मालवीय यांच्याविरोधात गुन्हा का दाखल करण्यात आला होता?

भाजपा नेते अमित मालवीय यांनी उदयनिधींच्या सनातन धर्मावरील वक्तव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. उदयनिधींच्या भाषणाचा व्हिडिओ तोडून-मोडून सादर करण्यात आला होता. ज्यामध्ये उदयनिधी सनातन धर्म पाळणाऱ्या ८० टक्के लोकांचा वंशसंहार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे मालवीय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मालवीय यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

मालवीय यांच्यामते, त्यांनी माध्यमांमध्ये उपलब्ध असणारा उदयनिधींच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करून त्यावर प्रश्न विचारले होते. मालवीय यांनी उदयनिधींचे भाषण सनातन धर्माचे पालन करणाऱ्या बहुतांश लोकांना कसे धोकादायक आहे असे सांगितले होते. तसेच या भाषणाने समाजात हिंसा पसरेल असाही दावा केला होता.