“मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, त्यामुळे CM नाही PM बदला”

मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला सहा महिन्यात पाच मुख्यमंत्री बदलणाऱ्या भाजपाला लगावण्यात आलाय.

BJP CM
रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात पडली मुख्यमंत्री पदाची माळ (फोटो ट्विटर आणि पीटीआयवरुन साभार)

गुजरात विधानसभा निवडणूक एक वर्षावर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची माळ भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या गळ्यात पडलीय.  गुजरात भाजपाच्या दीर्घकाळ चाललेल्या बैठकीनंतर पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समाजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. भाजपाने त्यांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मागील सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळेच आता काँग्रेसने या वरुन केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

नक्की वाचा >> RSS चा उल्लेख करत काँग्रेस नेत्याने सांगितलं रुपाणी यांच्या राजीनाम्याचं ‘मुख्य कारण’, म्हणाले…

भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन करोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उफाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?, असं काँग्रेसने अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलंय.

श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र असल्याचं अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.

भाजपाने सहा महिन्यांत पाच  मुख्यमंत्री बदलले

२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर कितीही विरोध वा टीका झाली तरीही राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपाने गेल्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपाने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.

आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपाने हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do not change the cm of state change the pm of country congress slams bjp over vijay rupani resignation scsg