पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वात सरकार आणि असीम मुनीर यांच्या नेतृत्वात लष्कर आहे. मात्र या सरकारला त्यांच्याच देशातले नेते आरसा दाखवत आहेत. जमीयत उलेमा ए इस्लाम (जेयूआयएफ) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी कराचीतल्या ल्यारीतून शाहबाज आणि मुनीर सरकारला सवाल केला आहे. पाकिस्तानने कसा दुतोंडीपणा केला ते रहमान यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानची दुटप्पी भूमिका कायमच उघड झाली आहे. आता त्यांच्या देशातले नेतेही त्यांना आरसा दाखवू लागले आहेत.
काय म्हणाले रहमान?
मौलाना रहमान म्हणाले, जर पाकिस्तानने अफगाणिस्तावर, काबूलवर हल्ला करणं हे योग्य आहे तर मग भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करण्यात चुकीचं काय? भारताने दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारलं त्यात काहीही गैर नाही. असं मत मांडत रहमान यांनी त्यांच्याच देशाला घरचा आहेर दिला आहे.
२२ डिसेंबरला ल्यारी या ठिकाणी पार पडली परिषद
२२ डिसेंबरला ल्यारी या ठिकाणी मजलिस इत्तेहाद-ए- उम्मत पाकिस्तान मध्ये धार्मिक संघटनांची एक सभा बोलवण्यात आली होती. त्यावेळी मौलाना फजलुर रहमान यांनी त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले की तुम्ही (पाकिस्तान सरकार) म्हणत असाल की अफगाणिस्तानवर हल्ला केला म्हणजेच आपल्या शत्रुराष्ट्रवार हल्ला केला. तुमची ही भूमिका स्पष्ट असेल तर मग भारताने जे केलं त्यात गैर काय? भारताने उद्या तुम्हाला सांगितलं की त्यांनी बहावलपूर आणि मुरीदके मध्ये हल्ला केला आणि काश्मीरमध्ये जो हल्ला तुम्ही केला त्याचा बदला घेतला आहे तर मग भारताच्या या कारवाईवर तुम्हाला आक्षेप का आहे? अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानने जे धोरण स्वीकारलं आहे त्या धोरणावर मौलाना रहमान यांनी कडाडून टीका केली. ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. या दरम्यान जमीयत उलेमा ए इस्लामच्या प्रमुखांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
मे महिन्यात राबवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर
पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निरपराध पर्यटकांवर एप्रिल महिन्यांत धर्म विचारुन गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर भारताने पाकिस्तानताला त्यांच्याच शब्दांत उत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केली होती. ज्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. त्यांनी भारतावर ड्रोन हल्ले केले होते. पण पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं होतं.
