मोहम्मद दीपकने सोशल मीडियावर कुठलेही मेसेज किंवा व्हिडीओ पोस्ट करु नयेत असे स्पष्ट निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. तसंच त्याच्या विरोधातली FIR रद्द करण्यासही स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला आहे. जस्टिस राकेश थपलियाल यांच्या एकल पीठाने याचिकाकर्त्यांच्या विरोधात गॅग ऑर्डर लागू केली आहे. यामध्ये कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की याचिकाकर्त्याने या नाम विवावादासंबधी सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची पोस्ट लिहू नये किंवा व्हिडीओ पोस्ट करु नये. कारण असं झाल्यास या संवेदनशील प्रकरणात बाहेरचा हस्तक्षेप वाढू शकतो असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.
मोहम्मद दीपकच्या वकिलांनी काय सांगितलं?
उत्तराखंड कोर्टाने मोहम्मद दीपकची याचिका रद्द केली आहे. तसंच मोहम्मद दीपकने पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचेही निर्देश दिले आहेत. मोहम्मद दीपकने कुठल्याही प्रकरे सोशल मीडियावर सक्रिय होऊ नये. कुठलेही व्हिडीओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर करु नयेत. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत २२ जणांची चौकशी केली आहे. त्यापैकी पाचजणाच्या विरोधातली कारवाई ही वेगाने होते आहे असा दावा मोहम्मद दीपक यांच्या वकिलांनी केला आहे. तसंच वकिलाने हा दावा केला की पोलिसांनी दीपक यांच्यारविरोधातच खटला दाखल केला. मोहम्मद दीपक हे ज्यादिवशी अशांतता माजली तेव्हा गर्दीला शांत करण्यासाठी गेले होते असाही युक्तिवाद मोहम्मद दीपकच्या वकिलांनी केला.
२६ जानेवारी २०२६ रोजी कोटद्वारमध्ये कपड्यांच्या दुकानाच्या नावावरून झालेल्या वादानंतर मोहम्मद दीपक हे नाव चर्चेत आलं. २६ जानेवारी रोजी एका ७० वर्षीय मुस्लिम दुकानदाराच्या धार्मिक ओळखीवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या छळाविरोधात उघडपणे आवाज उठवणाऱ्या दीपकवर आता गुन्हा दाखल झाला. त्याच्याविरोधात निदर्शनंही करण्यात आली.
नेमकं काय घडलं होतं २६ जानेवारीला?
२६ जानेवारी रोजी कोटद्वारमधील पटेल मार्गावर ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान चालवणारे वकील अहमद (वय ७०) यांना काही तरुणांनी दुकानाच्या नावातील ‘बाबा’ हा शब्द काढून टाकण्याची धमकी दिली. अहमद हे पार्किन्सन आजाराने त्रस्त आहेत. याच वेळी जवळच असलेल्या मित्राच्या दुकानात उपस्थित असलेल्या दीपक कुमारने हा प्रकार पाहून हस्तक्षेप केला. “हिंदू दुकानदार ‘बाबा’ नाव वापरू शकतात, मग ३० वर्षांपासून चालणाऱ्या या दुकानाला नाव बदलायला का सांगताय?” असा सवाल त्याने केला. यावेळी जमावाने दीपकला त्याचं नाव विचारलं, तेव्हा त्याने संतापात उत्तर दिलं – “माझं नाव मोहम्मद दीपक आहे.” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दीपक अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला.
मोहम्मद दीपकने इंडियन एक्स्प्रेसला काय सांगितलं होतं?
‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दीपकने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली – “माझं नाव ‘मोहम्मद दीपक’ सांगणं हे योग्यच होतं. मी फक्त देवालाच जबाबदार आहे. धर्मामुळे एका वृद्धाला धमकावले जात होते, तेव्हा त्याच्या बाजूने उभे राहणे हीच माणुसकीची गोष्ट होती. या आंदोलनांमुळे मला काही फरक पडत नाही.” तर, त्याचा मित्र विजय रावत, युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, म्हणतो, “खासगी दुकानात घुसून नाव बदलायला सांगणं हा गुन्हा नाही का? एफआयआरमुळे अजून जास्त लोक आमच्यासोबत उभे राहत आहेत.”
