मागच्या आठवड्यात फ्लायदुबईच्या विमानात जो थरार घडला त्यात कॅप्टन स्मित मच्छार यांच्या प्रसंगावधानामुळे आणि प्राणांची बाजी लावून केलेल्या प्रयत्नांमुळे १७० हून अधिक लोकांचे प्राण वाचले. को पायलट आणि ओमानी नागरिक असलेल्या हमाम अल हमामी याने स्मित मच्छार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. तसंच हे विमान त्याने पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्मित मच्छार यांनी जखमी अवस्थेतही विमान चालवलं. या सगळ्या घटनक्रमाबाबत विमानात उपस्थित असलेल्या दंतवैद्य डॉ. मुसायेव यांनी माहिती दिली आहे.
डॉ. मुसायेव यांनी काय सांगितलं?
स्मित मच्छार यांच्या शरीरावर आणि खासकरून डोक्यावर खूप जखमा झाल्या होत्या. मी त्यांना हे सांगितलं की कृपा करून झोप येऊ देऊ नकोस. डॉ. शुता मुसायेव या व्यवसायाने दंतवैद्य अर्थात डेंटिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की जेव्हा कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मी इतर प्रवाशांसह त्यांच्या दिशेने धावलो. तो क्षण असा होता की अवघ्या ५ ते १० सेकंदात आम्हा सगळ्यांचा मृत्यू झाला असता. मी स्मित मच्छार यांच्याकडे पाहिलं तर ते खाली पडले होते आणि खूप रक्तस्त्राव होत होता. आम्ही सगळ्यांनी मिळून हल्लेखोर को पायलटला पकडलं आणि त्याचे हात बांधण्यासाठी हेडफोनचा वापर केला. तो हल्लेखोर आम्हाला काहीही सांगायला तयार नव्हता. वारंवार फक्त हेच सांगत होता की मला मारून टाका. पण त्याला जेव्हा बांधलं तेव्हा त्याने नंतर कुठलाही विरोध दर्शवला नाही. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
कॅप्टन मच्छार यांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या
कॅप्टन मच्छार यांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला, मानेला आणि हातांना बरीच इजा झाली होती आणि त्यातून रक्त वाहात होतं. ते मी माझ्या परीने थांबवण्याचा प्रयत्न केला. पायलट मच्छार यांना म्हटलं काळजी करू नका सगळं नीट होईल. कॅप्टन मच्छार तेव्हा मला म्हणाले होते की प्लीज माझी मदत करा, मला मरायचं नाही. आज मला तो प्रसंग आठवला तरीही अंगावर काटा येतो. कारण विमानात अशी वेळ आली होती की आम्ही मृत्यूपासून फक्त ५ ते १० सेकंद लांब होतो. कॅप्टन मच्छार यांनी हिंमत दाखवली आणि आमचे प्राण वाचवले असंही शुता मुसायेव यांनी सांगितलं.
स्मित मच्छार यांना मी पाहिलं तर त्यांची पल्स डाऊन झाली होती, तसंच त्यांचे ओठ नीळे पडले होते. फ्लाईटच्या कॉकपीटमध्येच मी जे उपाय करता येतील ते केले. असं समजा की जणू ते कॉकपीटच ४०-४५ मिनिटांसाठी ऑपरेशन थिएटर झालं होतं. मी टी शर्टने त्यांच्या जखमा बांधल्या. पण रक्त वाहात होतं. मग मी क्रू मेंबर्सकडे बर्फ मागितला. त्यांच्या अंगावर झालेल्या जखमा खूप खोल होत्या. रक्त थांबवण्यासाठी बर्फाचा वापर केला. अशा अवस्थेत ती ४५ मिनिटं मी काढली. मी ती ४५ मिनिटं कधीच विसरू शकत नाही.
