‘ब्रिक्स’चे आवाहन

अफगाणिस्तानच्या भूप्रदेशाचा वापर इतर देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी केला जाऊ नये, असे पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ या प्रभावशाली गटाने गुरुवारी सांगितले. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हालचालींसह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा कठोरपणे मुकाबला करण्याचे आवाहनही या गटाने केले.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीसह तातडीच्या मुद्द्यांवर ‘ब्रिक्स’च्या ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आभासी परिषदेत सविस्तर चर्चा केली.

भारताने आयोजित केलेल्या या परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा आणि ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सानारो हे सहभागी झाले होते.

हिंसाचार टाळून अफगाणिस्तानील परिस्थिती शांततापूर्ण उपायांनी सुरळीत करण्याचे आवाहन या गटाने परिषदेच्या अखेरीस जारी करण्यात आलेल्या घोषणापत्रात केले.

काबूल विमानतळानजिक अलीकडेच अनेक बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा या गटाने कठोर शब्दांत निषेध केला. त्याचप्रमाणे महिला, मुले व अल्पसंख्याक यांच्या अधिकारांसह मानवाधिकारांचे रक्षण करण्याच्या आणि मानवीय परिस्थिती बहाल करण्याच्या आवश्यकतेवर परिषदेने भर दिला.