सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही सोशल साईट्सवर कोणतीही पोस्ट करण्याआधी दहादा विचार करावा लागतो नाहीतर ट्रोल होणे क्रमप्राप्त आहे. आता काँग्रेसचेच बघा ना! काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे काही फोटो @INCIndia या काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले. हे फोटो असे आहेत की ते पाहून कोणालाही हसू येईल. आता जिथे तुमच्या-माझ्यासारखे नेटकरी हसू शकतात. तिथे भाजपाच्या नेत्यांना हसायला तर कारणच मिळाले. मग काय एकामागोमाग भाजपाच्या नेत्यांनी राहुल गांधींचे फोटो रिट्विट करायला सुरूवात केली. हे फोटो असे आहेत की आम्हालाही रिट्विट करण्याचा मोह आवरत नाहीये असे म्हणत हे फोटो रिट्विट करण्यात आले आहेत. भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही हे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या फोटोंची चर्चा ट्विटरवर चांगलीच रंगली आहे.

The Many Facets Of rahul gandhi अशी कॅप्शन लिहून हे फोटो काँग्रेसने ट्विट केले. एकूण चार फोटो असून एका फोटो राहुल गांधी उजवीकडे दुसऱ्या फोटोत डावीकडे पाहात आहेत. तर आणखी एका फोटोत ते वर पाहात आहेत. या फोटोंची भाजपासोबतच नेटकऱ्यांनीही खिल्ली उडवली आहे. काँग्रेस ट्रोलिंग काँग्रेस असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर गायतोंडे नावाच्या एका नेटकऱ्याने तर जेव्हा आपण सिनेमा पाहतो आणि किसिंग सीन सुरू होतो तेव्हा असे म्हणत राहुल गांधी यांचे हे फोटो रिट्विट केले आहेत.

‘हॉटेलमधून बाहेर पडताना असे हावभाव असतात, मी पकडला तर जाणार नाही ना?’ ‘पप्पू अपग्रेट हो गया’ ‘पप्पू को पप्पू रहने दो जोकर मत बनाओ’ अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल गांधींचे फोटो रिट्विट करत त्यांची खिल्ली उडवली आहे.