तुरुंगातील करोना रुग्णांची सेवा करायचीय, परवानगी द्या; तिहारमधील अल-कायदाच्या दहशतवाद्याची याचिका

हा दहशतवादी पेशाने डॉक्टर असून त्याच्याकडे सात वर्षांचा अनुभव आहे

देशामधील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तरुंगांमधील कैद्यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाची लागण होताना दिसत आहे. मात्र याच रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मागण्यासाठीचा अर्ज तिहार तुरुंगामध्ये कैदेत असणाऱ्या एका डॉक्टरने केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या अल कायदाचा सदस्य असून दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपांखाली हा अर्ज करणारा डॉक्टर तुरुंगामध्ये आहे. दिल्ली सत्र न्यायालयामध्ये अर्ज करणाऱ्या या डॉक्टरचं नाव सबील अहमद असं आहे. विशेष न्यायालयात सबीलकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

ब्रिटनमधील ग्लासगो विमानतळावर २००७ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अहमदचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच सौदी अरेबिया आणि ब्रिटनमधील दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय.  भारत आणि परदेशातील अल कायदाच्या सदस्यांना आर्थिक व इतर मदत केल्याच्या आरोपावरून २२ फेब्रुवारी रोजी अहमदला दिल्लीतील विशेष पोलीस पथकाने अटक केली. सध्या तिहार येथील मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले असून आरोप निश्चिती आणि त्यांच्यावरील खटला सत्र न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. कैद्यांमधील वाढत्या करोनाच्या फैलावामुळे तुरुंग प्रशासनाला मदत करण्याची माझी इच्छा असल्याचं पेशाने डॉक्टर असलेल्या अहमदने याचिकेत म्हटलं आहे. ॲड. एम. एस. खान यांच्यामार्फत दिल्लीतील सत्र न्यायालयात त्याने अर्ज केला आहे.

आपल्या अशीलाला रूग्णांना हाताळण्याचा व त्यांच्यावर उपचार करण्याचा अनुभव असून त्याच्या या कौशल्याचा उपयोग तुरुंगातील कैद्यांसाठी होऊ शकतो, म्हणूनच कैद्यांवर उपचार करण्याची परवानगी सबीलला देण्यासंदर्भात तुरुंग अधीक्षकांना निर्देश द्यावेत अशी विनंती खान यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. अहमद एमबीबीएस डॉक्टर असून त्यांच्याकडे सात वर्षांचा अनुभव असल्याचा दावाही वकिलांनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेंदर राणा यांच्यासमोर उद्या १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. न्यायलायने यापूर्वीही अनेकदा तुरुंगामधील करोनाबाधितांच्या संख्येसंदर्भात अनेकदा चिंता व्यक्त केलीय. त्यामुळे या याचिकेसंदर्भात न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doctor alleged to be al qaeda operative seeks court permission to assist during covid crisis in tihar scsg