Karnataka Doctor Kidnapping Case: कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील एका खंडणी प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण एका प्रसिद्ध डॉक्टरचं अपहरण करून तब्बल ६ कोटींची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी नंतर चक्क या व्यक्तीला सरळ सोडून दिलं. शिवाय घरी परत जाण्यासाठी वर ३०० रुपयेही दिले! पोलिसांकडून या प्रकरणात कसून तपास केला जात असून अपहरणकर्त्यांचा शोध घेतला जात आहे. संबंधित डॉक्टरकडून अपहरणकर्त्यांची माहितीदेखील घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

नेमकं घडलं काय?

बेल्लारी जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. सुनील गुप्ता यांचं शनिवारी २५ जानेवारी रोजी अपहरण झालं. नेहमीप्रमाणे सकाळी ६ च्या सुमारास ते सूर्यनारायणपेट परिसरातील घराजवळच्या शनेश्वर मंदिरानजीक फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. मात्र, त्याचवेळी तिथे एका टाटा इंडिगो कारमधून काही व्यक्तींची टोळी आली आणि त्यांनी बळजबरीने सुनील यांना कारमध्ये बसवलं. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाल्याचं दिसत आहे.

३ कोटी रोख, ३ कोटींचं सोनं!

डॉ. सुनील गुप्ता यांच्या अपहरणानंतर त्यांचे भाऊ वेणुगोपाल गुप्ता यांना व्हॉट्सअॅपवर एक फोन आला. वेणुगोपाल गुप्ता हे बेल्लारी जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. सुनील यांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे तब्बल ६ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. यातली निम्मी खंडणी रोख स्वरूपात तर निम्मी खंडणी सोन्याच्या स्वरूपात देण्यासही सांगण्यात आलं.

…आणि ३०० रुपये देऊन सुटका झाली!

वेणुगोपाल गुप्ता यांनी लागलीच पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. जिल्ह्यात येणारे आणि जाणारे सर्व रस्तेबंद केले. प्रत्येक गाडीची तपासणी केली जाऊ लागली. पण एकीकडे पोलिसांकडून कसून तपास केला जात असताना दुसरीकडे अपहरणकर्त्यांनी मात्र अनपेक्षितपणे डॉ. सुनील यांची सुटका केली. शिवाय त्याबदल्यात एक रुपयाही न घेता उलट त्यांना घरी परत जाण्यासाठी ३०० रुपयेही दिले!

अपहरणकर्त्यांनी डॉ. सुनील यांना एका निर्जन स्थळी सोडलं आणि त्यांना बससाठी ३०० रुपये दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व घडामोडींमुळे डॉ. सुनील हे प्रचंड धक्क्यात आहेत. अपहरणकर्त्यांचा शोध पोलीस घेत असून त्याचवेळी डॉ. सुनील यांच्याकडून अपहरणकर्त्यांची माहिती मिळवण्याचाही प्रयत्न पोलीस करत आहेत. बंधू वेणुगोपाल गुप्ता हे मद्यविक्रेत्यांच्या संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळे व्यावसायिक शत्रुत्वातून हा प्रकार झालाय का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor kidapped in karnataka ballari 6 crore ransom demand let go with 300 rupees pmw