करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा जगाने धसका घेतला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. मात्र, दुसरीकडे या विषाणूची समाजात दहशत निर्माण झाल्याचंही दिसतंय. असंच एक उदाहरण कानपूरमध्ये पाहायला मिळालं. कानपूरमधील कल्याणपूर भागात एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली आणि फरार झाला. हत्येनंतर त्याने आपल्या डायरीत आता मृतदेह मोजायचे नाही, कारण ओमायक्रॉन सर्वांना मारणार आहे, असं लिहिलं आहे. त्यामुळे या हत्येचं गूढ वाढलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

आरोपी पती कानपूरच्या रामा मेडिकल कॉलेजमध्ये फॉरेंसिक मेडिसीन विभागाचा प्रमुख होता. तो आपल्या कुटुंबाची हत्या करून फरार झालाय. हत्येनंतर आरोपीने आपल्या जुळ्या भावाला व्हॉट्सअप मेसेज करून या हत्येबाबत पोलिसांना माहिती देण्याचा मेसेज केला. यानंतर पोलिसांना एका बंद फ्लॅटमध्ये ३ मृतदेह आढळले. यात आरोपीच्या पत्नी चंद्रप्रभासह इंजिनीअरींगचं शिक्षण घेणारा मुलगा शिखर सिंह आणि मुलगी खुशी सिंह यांचा मृतदेह आढळला. आरोपीने आधी चहातून बेशुद्ध करण्याचं औषधं दिलं आणि मग हातोडीने वार करून हत्या केल्याचा संशय आहे.

आरोपी डॉक्टरकडून नैराश्यातून कुटुंबाच्या हत्येचा दावा

पोलीस उपायुक्त म्हणाले, “कल्याणपूर पोलीस स्टेशन हद्दीत इंदिरानगर येथे एका हत्येबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही सर्व अधिकारी घटनास्थळावर पोहचलो. प्राथमिक तपासात एक महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह घरात आढळले. या पीडित महिलेचा पती डॉक्टर सुनिलने त्याच्या भावाला एक मेसेज पाठवला आहे. त्यात आरोपीने नैराश्यातून (Depression) असं कृत्य केल्याची माहिती दिली.”

हेही वाचा : “घाबरण्याचं शून्य टक्के कारण, फक्त या २ गोष्टी…”, राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर राजेश टोपेंची प्रतिक्रिया

“या घरात एक डायरी देखील सापडली आहे. त्यात या घटनेविषयी लिहिलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात पुढे जशी माहिती मिळेल तशी ती माध्यमांना दिली जाईल,” असं पोलिसांनी नमूद केलं.