मागच्या आठवड्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेचा हिजाब खेचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरुन काँग्रेस आणि राजदने नितीश कुमार यांच्या राजीनामाही मागितला होता. या प्रकरणातील महिलेने आता डॉक्टर म्हणून बिहारमध्ये नियुक्ती स्वीकारली आहे. डॉक्टरांना नियुक्ती पत्र देण्याचा समारंभ बिहारमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी नितीश कुमार यांनी या महिलेचा हिजाब खेचला होता. ज्यावरुन नितीश कुमार यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. आता या महिलेने डॉक्टर म्हणून नियुक्ती स्वीकारली आहे.
हिजाब खेचण्याचं प्रकरण नेमकं काय?
लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने मागील आठवड्यात एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये, हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू १०० टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तर, काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरुन संताप व्यक्त करत, हे कृत्य माफी योग्य नाही असे म्हटलं आहे.
काँग्रेसनेही केली टीका
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा निर्लज्जपणा बघा, जेव्हा एक महिला डॉक्टर आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी आली तेव्हा नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरुन हिजाब खेचला. बिहारच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे असे नीच कृत्य केलं आहे. विचार करा, राज्यातील महिला किती सुरक्षित आहेत? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. नितीश कुमारांनी या कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, हे माफीलायक नाही, असेही काँग्रेसने म्हटलं आहे.
मृत्यूंजय तिवारी यांची नितीश कुमारांवर टीका
आरजेडीचे नेता मृत्यूंजय तिवारी यांनी व्हायरल व्हिडीओवरुन नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्री नितीश कुमार वारंवार महिलांचा अपमान करत आहेत. आता ते बिहार सांभाळण्याच्या स्थितीत नाहीत. अशाप्रकारची वागणूक एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही”, अशी टीका मृत्यूंजय तिवारी यांनी केली आहे. आरजेडीचे प्रवक्ता एजाज अहमद यांनीदेखील या व्हिडीओवरुन नितीश कुमार यांच्यावर टीका केली.
