Malviya Nagar Hotel Fire Accident: दिल्लीतील मालवीय नगर येथील ‘फ्लरिश स्टे’ या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत होरपळून आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये विदेशी नागरिक अधिक असल्याचीही माहिती कळते आहे. ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ (B&B) योजनेअंतर्गत केवळ ६ खोल्या चालवण्याचा परवाना असताना याठिकाणी नियमबाह्यपणे २५ खोल्या उभ्या करण्यात आल्या होत्या. हॉटेलमधून बाहेर पडायला निमुळती जागा होती. ज्यामुळे अनेक लोक हॉटेलच्या इमारतीत फसले गेले. या आगीच्या घटनेतून दोन विदेशी नागरिकांचा चमत्कारिकरित्या जीव वाचला आहे.

बाह ट्रिमडिजिऊ हे आगीच्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. गेल्या दोन महिन्यापासूनते वडील बहसून यांच्याबरोबर दिल्लीत मुक्कामी आहेत. दक्षिण दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी काही दिवस थांबायला सांगितले

सोमवारी बाह आणि बहसून हे उपचार आटोपून पुन्हा मालवीय नगरमधील हॉटेलमध्ये परतणार होते. पण डॉक्टरांनी त्यांना आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये थांबून आराम करण्याचा सल्ला दिल. बुधवारी सकाळी बाहने हॉस्पिटलमधून पटकन हॉटेलमध्ये जाऊन आंघोळ वगैरे करून परत येण्याचा विचार केला. यासाठी तो हॉस्पिटलमधून निघून मालवीय नगरच्या फ्लोरीश बेड अँड ब्रेकफास्ट येथे आला. तेव्हा त्याला कळले की, हॉटेलला आग लागली आहे.

द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना बाह म्हणाले की, मी हॉटेलमधील चौथ्या मजल्यावरील रुम नं. ४०२ मध्ये थांबलो होतो. मी रोज सकाळी हॉटेलमध्ये येऊन आंघोळ करत होतो आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जात होतो. दोन महिन्यापूर्वी आम्ही गिनीमधून येथे आलो. मॅक्स हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांवर कर्करोगावरील उपचार सुरू आहेत.

Delhi Malviya Nagar restaurant fire | दिल्ली मालवीय नगर रेस्टॉरंट आग | Flourish Stay BB fire rescue operations | South Delhi ASP Anant Mittal disaster management 2026
दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू. (फोटो – AP)

नेहमीप्रमाणे आज सकाळी मी जेव्हा हॉटेलच्या परिसरात आलो, तेव्हा मला कळले की इथे आग लागली आहे, अशी प्रतिक्रिया बाह यांनी दिली. याबरोबरच त्यांचे अनेक मित्र आतमध्ये असल्याचेही ते म्हणाले. दोन महिन्यात माझी अनेकांशी मैत्री झाली होती. त्यांच्याबरोबर महिला आणि लहान मुले होती. ते जिवंत आहेत की नाही? याचीही माहिती मिळाली नाही.

“मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर पाहिले तर संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. नायजेरीयामधील माझा एक मित्र तळमजल्यावर राहत होता. तो आता कुठे आहे? याची काहीच कल्पना नाही”, अशीही खंत बाह यांनी व्यक्त केली.

बाह यांच्याप्रमाणेच आफ्रिकन वंशाचे मायकल हे अमेरिकन नागरिकही पत्नीच्या उपचारासाठी दिल्लीत आले होते. बाह आणि त्याच्या वडिलांप्रमाणेच तेही या आगीतून थोडक्यात वाचले. “माझी पत्नी आणि मी हॉस्पिटलमध्ये सकाळीच निघालो. त्यानंतर ८ वाजून ४० मिनिटांनी हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माझ्याबरोबर आलेले माझे तीन मित्र हॉटेलमध्येच होते”, अशी प्रतिक्रिया मायकल यांनी दिली.

मायकल म्हणाले की, हॉटेलमध्ये ये-जा करण्यासाठी एकच दरवाजा होता. यामुळे बचाव कार्यात अडथळा आल्याची शक्यता आहे.

सदर हॉटेलच्या परिसरात एम्स, मॅक्स आणि पंडीत मदन मोहन मालवीय हे तीन मोठे रुग्णालये आहेत. त्यामुळे आफ्रिका आणि इतर गरीब देशांमधून अनेक नागरिक उपचारांसाठी इथे येत असतात. त्यांच्या मुक्कामासाठी हे हॉटेल सोयीचे होते.