सरकारी रुग्णालयांची दुरावस्था हा कायम चर्चेचा विषय असतो. कधी औषधांचा तुटवडा,नादुरुस्त वैद्यकिय उपकरणे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, तर कधी उपचार करताना झालेली चूक. या आणि अश्या अनेक तक्रारी आपण सतत ऐकत असतो. सध्या छत्तीसगड राज्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमुळे पुन्हा एकदा देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. 

छत्तीसगडमधील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे हे सांगणारा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील वैकुंठपुरमधील असल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हा फोटो येथील जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीची तब्येत खूप बिघडली. तेव्हा त्या रुग्णाला त्वरीत उपचार मिळावेत यासाठी त्याचे नातेवाईक त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन आले. मात्र तिथे पोचल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काच बसला. त्या रुग्णावर उपचार करण्यासाठी इथल्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर्सच उपलब्ध नव्हते. रुग्णाची प्रकृती सतत बिघडत होती त्यामुळे त्वरीत उपचार होणं गरजेचं होतं. शेवटी नाईलाजाने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून थेट डॉक्टरांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाल्यानंतर छत्तीसगडमधील सरकारी आरोग्य व्यवस्थेवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

   या घटनेनंतर रूग्णालय प्रशासनावर टीका होण्यास सुरुवात झाली. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. रुग्णालयाने लेखी स्पष्टीकरण जाहीर करत या घटनेबाबत म्हटले आहे की रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतःहून रुग्णाला डॉक्टरकडे तापसण्यासाठी नेण्याची मागणी केली होती. त्यांना तिथून पुन्हा जिथे उपचार सुरु होते तिथे पाठवण्यात आले. रुग्णालयात ओपीडी बंद होती का प्रश्नाचं उत्तर देणं मात्र रूग्णालय प्रशासनाने टाळलं आहे.