Israel Prison Palestinian Prisoners Torture: हमास या दहशतवादी गटाने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये अनपेक्षित हल्ला करून शेकडो इस्रायली नागरिकांची हत्या केली आणि इतर शेकडो लोकांचे अपहरण केले होते. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही तातडीने प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर नृशंस हल्ले चढवले. तब्बल दोन वर्षे इस्रायलकडून गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव सुरू होता. या संघर्षात इस्रायली सैनिकांनी अनेक पॅलेस्टिनी नागरिकांना अटक केली होती. अटकेत असलेल्या लोकांवर अघोरी अत्याचार करण्यात आले. तुरुंगात नरकयातना भोगणाऱ्या कैद्यांनी आपबिती सांगितली असून अल जझिरा संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

इस्रायलच्या तुरुंगात पॅलेस्टिनी कैद्यांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागल्या. त्यांच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचारासारखे गुन्हे घडले. या कैद्यांना त्यांच्या नावाऐवजी नंबर देण्यात आले होते. या नंबरवरूनच त्यांना संबोधले जायचे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्याची आपल्याला काहीही माहिती नाही, असे वारंवार सांगूनही इस्रायली सैन्याने सातत्याने अत्याचार केले, असा आरोप करण्यात येत आहे.

अल जझिराने या विषयाचे विस्तृत संशोधन केले असून त्याची माहिती बाहेर आणली आहे. २०२३ साली ताब्यात घेतलेल्या कैद्यांवर चौकशीच्या नावाखाली अनेक काळ अत्याचार केले गेले. ज्या कैद्यांवर अमानवीय अत्याचार झाले, त्यांनी अल जझिराशी बोलताना अन्यायाचा पाढा वाचला.

आम्ही विव्हळत होतो, पण ते हसत होते

एका कैद्याने अल जझिराशी बोलताना सांगितले की, एप्रिल २०२४ मध्ये रमझान जवळ येत असताना माझ्यासह सात कैद्यांना १२ इस्रायली सैनिकांनी घेरले. यावेळी त्यांच्याबरोबर पाळीव श्वानही होते. आमचे कपडे उतरवले गेले आणि त्यानंतर बलात्कार करण्यात आला. या अश्लाघ्य प्रकारात इस्रायली सैनिकांनी श्वानांचाही वापर केला. हे श्वान सैनिकांचे हुकूम ऐकून त्यानुसार वागत असत.

israel gaza war
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘आम्ही देवाचे नाव घेऊन ओरडत होतो, देवाचा धावा करत होतो. त्यावेळी सैनिक मात्र मोठमोठ्याने हसत होते. या घटनेचे ते रेकॉर्डिंग करत होते’, अशी कटू आठवण या कैद्याने सांगितली.

आणखी एका कैद्याने सांगितले की, त्याच्या नावाच्या ऐवजी त्याला एक क्रमांक देण्यात आला होता. तसेच त्याने स्वतःही याच नंबरने ओळख सांगावी, अशी त्यावर बळजबरी करण्यात आली. “कैद्यांना त्यांच्या पोटावर जमिनीवर झोपण्यास सांगितले जायचे. त्यांचे हात आणि पायांना बेड्या ठोकल्या जायच्या आणि त्यानंतर त्यांच्या शरीरावरून श्वानाला फिरवले जायचे”, अशी धक्कादायक बाबही कैद्याने सांगितले.

गाझापट्टीत मजुरी करत असलेल्या आणखी एका कैद्याने त्याच्याबरोबर घडलेल्या विकृतीची माहिती दिली. सैनिकांच्या श्वानाची मदत घेऊन त्याच्यावर वारंवार बलात्कार झाल्याचे कैद्याने सांगितले. तसेच महिला अधिकाऱ्यांनीही विविध वस्तूंचा वापर करत लैंगिक अत्याचार केला. “त्या आमचे हात मागे करून साखळीने बांधत असत. मग पायांनाही साखळदंडांनी जखडून ठेवले जायचे. त्यानतर आमचे कपडे उतरवले जायचे”, अशी माहिती कैद्याने दिली.

या कैद्याच्या पाठीवर आणि गळ्यावर सैनिक बूट ठेवून उभे राहायचे आणि इतर सैनिक या घटनेचे चित्रीकरण करत असताना टाळ्या वाजवायचे, असेही ते म्हणाले.

israel bombing on gaza
गाझापट्टीवर बॉम्बवर्षावर करून इस्रायलने अनेक इमारती जमीनदोस्त केल्या.

आम्ही त्यांना वारंवार विनंती केली, “हमासच्या हल्ल्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. मात्र तरीही ते आमच्यावर अत्याचार करतच राहिले. “तुम्ही आमच्या देशात आलात. इस्रायलच्या भूमीत शिरलात आणि आमच्यावर हल्ला केला. आमच्या देशात बलात्कार केले, असे केले, तसे केले”, असे इस्रायली सैनिक वारंवार बोलत असल्याची माहिती कैद्यांनी दिली.

नेतान्याहूंच्या पक्षाच्या नेत्यांनी केले समर्थन

अल जझीराच्या वृत्तानुसार, २०२४ साली दक्षिण इस्रायलच्या एका तुरुंगात कैद्यावर बलात्कार होत असल्याचा व्हिडीओ बाहेर आला होता. या व्हिडीओनंतर संतापाची लाट पसरली होती. सदर कैद्याला नंतर उपचारासाठी बाहेर आणले गेले. मात्र उपचार केल्यानंतरही त्याला नीट चालता येत नव्हते.

या व्हायरल व्हिडीओनंतर इस्रायली सुरक्षा दलाच्या काही सैनिकांना अटक करण्यात आली. मात्र उजव्या विचारसरणीचे काही नेते आणि नेतान्याहूंच्या मंत्र्यांनी बलात्काराच्या घटनेचे समर्थन केले. पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हनोक मिलविडस्की यांना प्रश्न विचारला गेला की, एखाद्या कैद्याच्या गुदद्वारात वस्तू घालणे योग्य आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले, “जर तो नुखबा (हमासचा अतिरेकी) असेल तर ते योग्य आहे. सर्व काही योग्य.”

इस्रायलचे संरक्षण मंत्री इतामार बेन ग्विर यांनीही सैनिकांना पाठिंबा दर्शवला होता. इस्रायलमधील कारागृहे आयडीएफच्या अंतर्गत येत असून आमचा सैनिकांना पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले होते.