भारत बलाढ्य देश असल्यामुळेच चीनसोबत असलेला डोकलामचा तिढा सुटला. भारत कमकुवत असता तर हा प्रश्न कधीच सुटला नसता,असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या एका रॅलीच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भारताची प्रतिमा आणि महत्त्व यामध्ये जागतिक स्तरावर सकारात्मक बदल झाला आहे, असेही सिंह यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद ७० दिवस सुरु होता. दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेण्याचे इशारे आणि युद्धाचे इशारे देण्यात येत होते. मात्र, भारताने हा प्रश्न अत्यंत समंजसपणे हाताळला. चीनने डोकलाममध्ये रस्ते बांधणीचे काम हाती घेतले होते. ते बेकायदेशीर असल्याचे भारत आणि भुतान या दोन्ही देशांचे म्हणणे होते. यावरून डोकलामचा वाद सुरु झाला होता.

चीनने आडमुठेपणा दाखवत त्यांचे सैन्य या ठिकाणी घुसवले. मग भारतानेही सैन्य सीमेवर अतिरिक्त कुमक तैनात केली होती. हा वाद जून महिन्याच्या मध्यावर सुरू झाला आणि ऑगस्ट महिन्यात मिटला. अखेर दोन्ही देशांनी ७० दिवसांनी आपले सैन्य मागे घेतले. मात्र, भारताने हे प्रकरण ज्या समंजस आणि राजकीय परिपक्वतेने हाताळले त्यावरून भारत हा बलाढ्य देश आहे, याचे महत्त्व जगाला पटले असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले.