scorecardresearch

उन्हाळ्याची सुट्टी पडणार महागात? देशांतर्गत विमानप्रवास महागला; तिकीटात १५ ते ३० टक्क्यांची वाढ

मात्र दुसरीकडे करोनाचा प्रभाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे.

Plane
प्रातिनिधिक छायाचित्र

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लवकरच सुरू होतील. मात्र या सुट्ट्यांच्या तोंडावरच आता विमान प्रवास महागल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने विमानप्रवासाच्या खर्चात १५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.


कच्च्या तेलाच्या भावात तेजी असल्याने विमान कंपन्यांनी देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यात देशार्गंत विमानांच्या तिकीटामध्ये १५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे करोनाचा प्रभाव कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परदेशगमन स्वस्त होऊ शकते असा अंदाज बांधण्यात येत आहे. करोना काळात देशाबाहेरील विमान उड्डाणांवर निर्बंध असल्याने विमान प्रवास महाग झाला होता.


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म इक्सिगोने सांगितले की, २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान दिल्ली ते मुंबई एकावेळच्या प्रवासाचे तिकीट प्रति प्रवासी ५,११९ रुपये एवढे होते. मात्र त्यानंतर आता हे तिकीट २६ टक्क्यांनी महागले आहे. याचप्रमाणे कोलकाता ते दिल्ली दरम्यानच्या तिकिटांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. हा प्रवास तब्बल २९ टक्क्यांनी महागला आहे.


रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा फटका हा कच्च्या तेलाच्या मार्केटला बसत आहे. रशियामधून मोठ्याप्रमाणात कच्चे तेल निर्यात होते. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इतर युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातल्याने कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 130 डॉलरवर पोहोचले होते. मात्र आता दरात काही प्रमाणात घट झाली असून, सध्या कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रति बॅरल इतके आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Domestic air fare up on oil spike but flights abroad may get cheaper vsk

ताज्या बातम्या