मुंबई : वातावरणातील बदल, खराब हवामान यांचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसत असून देशभरात १९.१ टक्के उड्डाणे हवामानाच्या कारणांसाठी रद्द झाल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या २०२६च्या पहिल्या तिमाहीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय वेळेत उड्डाण न झाल्यानेही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला असून यामध्ये प्रतिक्रियात्मक विलंब हा घटक सर्वाधिक परिणामकारक ठरला आहे.
हवामानातील बदलांमुळे विमानांची उड्डाणे उशिरा होणे, रद्द करणे किंवा वळवणे यांसारख्या समस्या उद्भवतात. विमानोड्डाण रद्द होण्यासाठी तांत्रिक कारणे ३८.४ टक्के तर परिचालनात्मक कारणे २७.२ टक्के कारणीभूत ठरतात. देशांतर्गत रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये मार्च महिन्यात ‘इंडियावन एअर’चे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामागोमाग ‘अलायन्स एअर’, ‘स्पाइस जेट’, ‘फ्लाय वन’, ‘स्टार एअर’, ‘एअर इंडिया ग्रुप’, ‘इंडिगो’ आणि ‘अकासा एअर’ची विमाने रद्द झाली आहेत. ‘अकासा एअर’ची मार्च महिन्यात ०.०७ टक्के उड्डाणे रद्द झाली. ही उड्डाणे सहा टक्के वेळा व्यावसायिक कारणांसाठी रद्द झाली.
विमानतळावर प्रवाशांना विलंबाने होणार्या विमानोड्डाणांच्या त्रासाचाही सामना करावा लागला आहे. मुंबई विमानतळावर २७.६ टक्के वेळा विमानांचे उड्डाण विलंबाने झाले, तर वक्तशीरपणामध्ये चेन्नई विमानतळाचा क्रमांक मार्चमध्ये सर्वात वरचा आहे. विमानोड्डाणाच्या विलंबाच्या कारणांमध्ये ६६ टक्के प्रमाण प्रतिक्रियात्मक विलंबाचे आहे, तर १० टक्के परिचालनात्मक समस्या, नऊ टक्के हवाई वाहतूक नियंत्रण समस्या, चार टक्के तांत्रिक, तीन टक्के विमानतळ आणि दोन टक्के प्रवासी अशी कारणे स्पष्ट केली आहेत. विलंबाची नोंद करताना नियोजित वेळेनंतर किमान १५ मिनिटांनी उड्डाणे गृहीत धरण्यात येते. मार्च २०२६ मध्ये देशभरात ०.९२ टक्के विमानांना दोन तासांहून अधिक विलंब झाला. यात ‘स्पाइस जेट’चे प्रमाण सर्वाधिक होते.
विमानाला हादरे बसण्याच्या प्रमाणात वाढ
’बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या जागतिक तापमानाचा विमान वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. यामुळे केवळ उड्डाणांना उशीर होत नाही तर विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसानही होते. ’हवेतील उष्णता वाढल्यामुळे आणि हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आता कोणत्याही ऋतूत विमानाला हादरे बसण्याचे प्रमाण वाढले आहे.
