कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार व माजी मंत्री सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. यामुळे सध्या जामिनावर असलेल्या भारती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणावर २३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

सोमनाथ भारती यांची पत्नी लिपिका यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार लिपिका या गर्भवती असताना सोमनाथ भारती यांनी आपला कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने लिपिका यांचा चावा घेतला. या हिंसक कृतीद्वारे सोमनाथ यांनी आपल्याबरोबरच गर्भातील बाळाचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लिपिका यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणात सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध कलम ३०७ बरोबरच संबंधित कलमांद्वारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे आहेत, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. भारती यांच्याबरोबरच या प्रकरणात कपिल वाजपेयी, बानेय सिंग आणि नितीश या तिघांची नावे आरोपपत्रात आहेत. आरोपपत्रात भारती यांची आई मनोरमा भारती यांचाही उल्लेख आहे.