Video: “बायबलमधील प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे पण…”; भारताबद्दल बोलताना ‘या’ देशाचे PM गहिवरले

खास व्हिडीओ शेअर करत मानले सर्व भारतीयांचे आभार

करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने देशामध्ये लसीकरणाला सुरुवा केली आहे. देशांतर्गत लसीकरणाला सुरुवात करतानाच भारताने जागतिक स्तरावर करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कंबर कसली असून अनेक देशांना भारताने करोना लसींचे डोस मोफत देण्यास सुरुवात केलीय. तर काही देशांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये भारताकडे मदत मागणाऱ्या या देशांपैकीच एक असणाऱ्या डॉमनिकन रिपब्लिकची मागणी भारताने मान्य केली आहे. डॉमनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कैरिट यांनी भारताने करोना लसीचे ७० हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी करणारं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. त्यानुसार अवघ्या दोन आठवड्यांमध्ये भारताने ही मागणी मान्य करत बुधवारी डॉमनिक रिपब्लिकला ७० हजार डोस पाठवले. भारताकडून एवढ्या तात्काळ मदत मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती असं सांगत भावूक झालेल्या स्कैरिट यांनी सर्व भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

करोना लसींचे डोस घेऊन जाणारं विमान डॉमनिकन रिपब्लिक पोहचल्यानंतर देशाचे पंतप्रधान स्कैरिट यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावाना व्यक्त केल्या. “मी इतकचं म्हणेल की आमची मागणी एवढ्या तातडीने मान्य करुन मदत केली जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. एवढं गंभीर संकट समोर असताना आपल्या देशाचं संरक्षण करणं किती आव्हानात्मक आहे हे कोणीही सांगू शकतो. असं असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने मदतीचा हात पुढे केल्यानेच आम्हाला ही लस मिळाली. आम्हाला प्राधान्य देत त्यांनी मदत केली. त्यांनी आमच्यासारख्या लहान देशातील लोकांचाही लसीवर तितकाच अधिकार असल्याचे कृती मधून दाखवून देत आमचा समानतेच्या हक्कावर शिक्कामोर्तब केलं. त्यासाठी मी त्यांचा आभार आहे,” असं स्कैरिट यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवरुनही त्यांनी भारताचे आभार मानले आहेत. बायबलमधील प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे पण मी हे नक्कीच मान्य केलं पाहिजे की माझ्या देशाची प्रार्थनांना एवढ्या लवकर आणि तातडीने उत्तर मिळेल असं वाटलं नव्हतं. धन्यवाद भारत, असं स्कैरिट यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

अन्य एका ट्विटमधून त्यांनी तातडीने देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी करोना लसीकरणासंदर्भातील काही माहितीही ट्विट केली.

स्कैरिट यांनी पत्रात काय म्हटलं होतं?

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये स्कैरिट यांनी भारतीय पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रामध्ये मदतीचं आवाहन करत भावनिक साद घातली होती. “जगाने २०२१ मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-१९ विरोधातील लढाई सुरु आहे. डॉमनिकमधील ७२ हजार लोकसंख्येला ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार करोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे,” असं पत्रात स्कैरिट यांनी म्हटलं होतं.

“सध्या करोनाची लस मिळवण्याची जागतिक स्तरावर जी स्पर्धा सुरु आहे त्याच पार्श्वभूमीवर मी तुम्हाला आमच्या देशातील जनतेसमोरील समस्यांबद्दल सांगू इच्छितो. निर्माण करण्यात येणाऱ्या करोना लसींपैकी अर्ध्या लसी देशातील विकसनशील देशांना देण्याचा शब्द ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनने दिला असला तरी आमच्या देशातील लोकांना ही लस एवढ्या मिळणार नाही असं चित्र दिसत आहे. आमचा देश हा एक छोटसं बेट असून तो विकसनशील देशांपैकी एक आहे. करोना लसींसाठी सध्या जगभरामध्ये स्पर्धा सुरु असून या मोठ्या देशांच्या करोना लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टीकणार नाही. त्यामुळेच भारताने आम्हाला मदत करावी,” अशा शब्दांमध्ये स्कैरिट यांनी भारतीय पंतप्रधानांकडे मदत मागितली होती.

भारत डॉमनिक रिपब्लिकचे मैत्रीपूर्ण संबंध

डॉमनिकन रिपब्लिकचे भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जम्मू काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर चीन पाकिस्तानचे समर्थन करत असतानाच कॅरेबियन बेट समुहांमध्ये असणाऱ्या या छोट्याश्या देशाने भारताची बाजू घेतली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dominican pm roosevelt skerrit thanks india for sending coronavirus vaccine scsg