महिलांबाबत लैंगिक अश्लील विधानांच्या ध्वनिचित्रफितीमुळे अमेरिकी अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन कमी होऊ लागले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला असला तरी ट्रम्प यांनी मैदानातून माघार घेण्यास नकार दिला आहे.

रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांनी पुढील महिन्यातील अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी सुरू झाली आहे, शिवाय जनमत चाचण्यात त्यांचे स्थान घसरले आहे. सिनेटर्स व गव्हर्नर्स यांनी ट्रम्प यांच्या ध्वनिचित्रफितीपासून दोन हात दूर राहणेच पसंत केले आहे. ट्रम्प हे वर्षभरापूर्वी रिपब्लिकन पक्षात आलेले न्यूयॉर्कचे स्थावर मालमत्ता सम्राट एकदम अध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत आले. एकापाठोपाठ एक सिनेटर्स व गव्हर्नर्स यांनी ट्रम्प यांची साथ सोडली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले, की या वादानंतरही मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून माघार घेणार नाही.

मला अविश्वसनीय पाठिंबा आहे. हिलरी क्लिंटन या काही चांगल्या उमेदवार नाहीत. मी आयुष्यात कधी माघार घेतलेली नाही. आताही मला पाठिंबाच मिळत आहे. ट्रम्प यांना विस्कॉन्सिन येथील कार्यक्रम रद्द करावा लागला असून, ते २४ तास न्यूयॉर्कच्या ट्रम्प टॉवरमध्ये होते व तेथे त्यांनी निकटवर्तीयांशी चर्चा केली. रिपब्लिकन सिनेटर जॉन मॅक्केन यांनी ट्रम्प यांच्या उमेदवारीस दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.

अमेरिकी भारतीयांनी ट्रम्प यांची साथ सोडली

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांविषयी केलेल्या अश्लील वक्तव्यांची ध्वनिचित्रफीत जाहीर झाल्यानंतर भारतीय अमेरिकी लोकांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी ज्या प्रकारची विधाने केली आहेत ती प्रक्षोभक व आजारी मानसिकतेची निदर्शक आहेत, असे भारतीय अमेरिकी लोकांचे म्हणणे आहे. आता ट्रम्प यांना थांबवले पाहिजे. वंशविद्वेश, वर्णभेद व लैंगिक विषय यावर मांडलेल्या मतांमुळे ट्रम्प खरेतर केव्हाच अपात्र ठरले होते.