अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यात ट्रम्पविरोधकांना जोरदार धक्क बसला आहे. दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या खटल्याकडे जगाचे लक्ष लागले होते. त्यात अमेरिकनं सिनेटनं ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहे. सिनेटनं आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून, ट्रम्प यांचा विजय झाला आहे. रिपब्लिकन पक्षाने ५२-४८ च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ५३-४७ मतांनी ट्रम्प यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.  आगामी निवडणुकीत या निकालाचा ट्रम्प यांना लाभ होऊ शकतो.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दहा महिने उरलेले असताना तेथे हे राजकीय नाटय़ सुरू आहे. सत्तेचा गैरवापर करणे आणि काँग्रेसच्या कामात अडथळे आणणे, असे दोन आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होते. या सुनावणीच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस होते. अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत महाभियोगाची कारवाई अध्यक्षांवर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

 दोन आरोप कोणते?

अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय काळात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून त्यांना अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिदेन यांच्या युक्रेनमधील व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले होते, त्यात त्यांनी अधिकाराचा दुरूपयोग केला असा पहिला आरोप आहे. त्यानंतर प्रतिनिधिगृहात या प्रकरणी महाभियोग चौकशी सुरू असताना व्हाइट हाऊसचे अधिकारी व इतर सहकाऱ्यांना समितीसमोर साक्ष देण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी पुरावे गोळा करण्यात बाधा आणली असा दुसरा आरोप आहे.