वॉशिंग्टन, तेहरान : पश्चिम आशियातील शांततेसाठी इराणबरोबर तीन महिन्यांच्या शस्त्रसंधीला आणखी ६० दिवस मुदतवाढ देण्यासाठी करारावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आपण आपल्या सल्लागारांबरोबर बैठक घेत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
दुसरीकडे, ‘इराणचा हमी आणि शब्दांवर विश्वास नसून, कृतीवर विश्वास आहे. समोरच्या बाजूने काही होईपर्यंत इराणही काही कृती करणार नाही,’ असे प्रतिपादन अमेरिकेबरोबर सल्लामसलत करणारे इराणचे वरिष्ठ अधिकारी मोहंमद कालिबाफ यांनी केले. त्यांनी ‘एक्स’वर टिप्पणी करून इराणची भूमिका मांडली.
युद्धविराम वाढविण्यासंबंधी आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंबंधी दोन्ही देशांत गुरुवारी करार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांचे वॉशिंग्टनमध्ये आगमन झाले. ते अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा करतील.
दर २४ तासांत ११ मुलांचा मृत्यू
जीनिव्हा : ‘लेबनॉनमध्ये गेल्या आठवड्यात दर २४ तासांमध्ये ११ मुले मृत्युमुखी किंवा जखमी झाली,’ असे ‘युनिसेफ’ने म्हटले आहे. युद्धविरामाच्या काळातही इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले केले असून, त्याचा फटका लहान मुलांना बसला आहे. गेल्या सात दिवसांत ७७ मुले इस्रायलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली किंवा जखमी झाली. शस्त्रसंधी जाहीर झाल्यापासून ५५ मुलांचा मृत्यू झाला आहे.
