Donald Trump on India-Pakistan War Trade Angle : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पु्न्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध रोखण्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ते म्हणाले, “मी हस्तक्षेप केला नसता तर हे युद्ध अणू युद्धात रुपांतरित झालं असतं”. एअर फोर्स वनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी व्यापाराला एक शस्त्र म्हणून वापरलं. जेणेकरून उभय देशांमधील युद्ध थांबावं”.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “तुम्हाला माहितीय, मी काय केलं? बाकीचे लोक विचारही करत नाहीत असं काहीतरी मी केलंय. परंतु, मी त्याबद्दल फार बोलत नाही. परंतु, आम्ही भारत व पाकिस्तानमधील एक मोठी समस्या सोडवली. संभाव्य अणू युद्ध रोखलं. मी पाकिस्तानशी बोललो, मी भारताशीही बोललो. या दोन्ही देशांचे नेते खूप चांगले आहे. ते शक्तीशाली आहेत. मात्र, ते आपसांत लढत होते आणि या देशांमध्ये अणू युद्ध झालं असतं. मी दोन्ही देशांना इशारा दिला की तुमच्यातील युद्ध असंच चालू राहिलं तर आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार थांबवू. त्यानंतर त्यांनी युद्ध थांबवलं”.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने श्रेय लाटण्याचा प्रयत्न

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच असा दावा केलेला नाही. १० मे पासून ते सातत्याने असे दावे करत आहे. २२ एप्रिल रोजी चार दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले. या चारपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानी होते, तर, दोनजण काश्मिरी होते. तसेच हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये शिजला होता, ही बाब तपासांत समोर आल्यानंतर आणि एका पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहीमेद्वारे मोठी कारवाई केली.

भारतीय हवाईदलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झालं होतं. मात्र, अचानक दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की हे युद्ध त्यांनी थांबवलं. ट्रम्प म्हणाले, मी मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी मीच हे युद्ध थांबवलं असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की “मी दोन्ही देशांना इशारा दिला की तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर अमेरिका तुमच्याबरोबरचा व्यापार थांबवेल. त्यानंतर दोन्ही देशांनी समजुतीने घेत युद्ध थांबवलं”.