Donald Trump Elon Musk Dinner: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यातील वादाची मोठी चर्चा झाली होती. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली होती. पण या वादाच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू म्हणून मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं. इतकचं काय तर ट्रम्प यांच्या सरकारमध्ये एलॉन मस्क यांची महत्वाची भूमिका देखील राहिलेली आहे. पण ट्रम्प प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी ‘बिग ब्युटीफुल बिल’ हे विधेयक मंजूर केलं आणि हाच मुद्दा ट्रम्प व मस्क यांच्यातील वादाचं कारण ठरला.

त्यानंतर एलॉन मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादाची मोठी चर्चा झाली होती. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील वाद मिटल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी एकत्र जेवण केल्याचा फोटो समोर आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया ट्रम्प आणि एलॉन मस्क हे एकत्र जेवण करत असल्याचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील फोटोमध्ये दिसत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा फोटो एलॉन मस्क यांनी एक्सवर शेअर केला आहे. तसेच मस्क यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, “काल रात्री राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्याबरोबर उत्तम जेवण झालं. २०२६ हे वर्ष अद्भुत असणार आहे.”

ट्रम्प-मस्क यांच्यातील संघर्ष कसा सुरू झाला होता?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहन कर सवलतीविषयी एक विधेयक आणलं होतं. या विधेयकावर मस्क यांनी नाराजी व्यक्त करत जाहीरपणे टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर ट्रम्प प्रचंड चिडले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मस्क यांना चांगलंच सुनावलं होतं.’मी एलॉन मस्क यांच्यावर खूपच नाराज आहे’, असं ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर ट्रम्प व मस्क यांच्यातील दुराव्याचं रुपांतर शाब्दिक युद्धात झालं आणि दोघांमधील संघर्ष एकदमच वरच्या टप्प्यावर पोहोचला. ‘मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प हे २०२४ ची निवडणूक हरले असते’, अशी पोस्ट मस्क यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली होती. त्यानंतर एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंध ताणले गेले होते.