Reliance Industries investment in USA oil refinery: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना उभारला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्रुथ सोशल मीडियावर त्यांनी ही घोषणा केली. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पाठिंब्याने हा प्रकल्प उभा राहत असल्याचेही त्यांनी म्हटले. ट्रुथवर त्यांनी लिहिले, “मला ही घोषणा करताना अभिमान वाटत आहे की, अमेरिका फर्स्ट रिफायनिंग टेक्सासच्या ब्राउन्सव्हिले येथे स्थापन होत आहे. ५० वर्षांतील टेक्सासमधील हा पहिलाच कारखाना आहे.”

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारल्यानंतर जगावर ऊर्जा संकट ओढवले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले असून गॅसचा पुरवठा विस्कळित झाला आहे. अशावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तेल प्रकल्प उभारत असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प प्रशासन गेल्या काही काळापासून तेल आणि नैसर्गिक वायूचे दर कमी करण्याच्या अनेक पर्यायांचा विचार करत आहे. ही घोषणा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ पोस्टमध्ये लिहिले, “अमेरिका पुन्हा एकदा ऊर्जा वर्चस्व राखण्याकडे वाटचाल करत आहे. आज मला अभिमानाने घोषणा करावीशी वाटते की, अमेरिकेच्या टेक्सासमधील ५० वर्षांतील पहिला तेल शुद्धीकरण प्रकल्प उभा राहत आहे. हा ३०० अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक असा करार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा, अमेरिकन कामगार, ऊर्जा आणि दक्षिण टेक्सासच्या महान लोकांचा हा विजय आहे.”

रिलायन्सचा उल्लेख करत म्हणाले…

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये रिलायन्सचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, “ही प्रचंड गुंतवणूक करत असताना भारतातील आमचे भागीदार आणि त्यांची सर्वात मोठी खासगी मालकी असलेल्या रिलायन्सचे आभार.”

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणे हे त्यांच्या अमेरिका फर्स्ट अजेंड्यामुळे शक्य झाले आहे. या धोरणामुळे परवानग्या मिळणे सुलभ झाले. कर कमी झाले. ज्यामुळे अब्जावधी डॉलर्सचे उद्योग पुन्हा एकदा देशात येत आहेत.

“ब्राउन्सव्हिलेच्या बंदराजवळ होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे अमेरिकन बाजराला इंधन पुरवठा होईल, राष्ट्रीय सुरक्षा आणखी मजबूत होईल, अमेरिकेचे ऊर्जा उत्पादन वाढेल, अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलर्सची भर पडेल आणि हा जगातील सर्वात स्वच्छ शुद्धीकरण प्रकल्प असेल. यातून जागतिक निर्यातीला नवे बळ मिळेलच त्याशिवाय या प्रदेशात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हक्काचा रोजगारही मिळेल. अशापद्धतीने अमेरिकेचे वर्चस्व निर्माण होईल. अमेरिका नेहमीच पुढे राहिल”, असे डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले.