अमेरिका-इराण संघर्षामुळे मध्य पूर्वेत अद्यापही युद्धाचे ढग गडद आहेत. अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाचा फटका जगाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. या दरम्यान मागील काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमासच्या संघर्षामुळेही जगात खळबळ उडाली होती. हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात आतापर्यंत शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता इस्रायल-हमास संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता निर्माण व्हावी, या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत एक मोठी घोषणा केली आहे.

इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘शांतता मंडळा’ने एका ऐतिहासिक कराराची घोषणा केली आहे. या युद्धविरामाच्या कराराला इस्रायल आणि हमासने सहमती दर्शवल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, या करारांतर्गत हमास आणि गाझामधील सशस्त्र गट आपली शस्त्रे खाली ठेवतील. या कराराच्या संदर्भातील माहिती ‘व्हाईट हाऊस’कडून एका निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हा करार गाझामध्ये नवीन पॅलेस्टिनी प्रशासनाद्वारे कारभार चालवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. तसेच ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, हा करार त्यांच्या ‘२०-कलमी योजने’चा एक महत्वाचा भाग आहे. गाझामध्ये शांतता प्रस्थापित करणं, हा या २०-कलमी योजनेचा मुख्य उद्देश आहे. गाझाचा कारभार एका नवीन पॅलेस्टिनी सरकारद्वारे चालवला जाईल आणि हे सरकार ‘बोर्ड ऑफ पीस’च्या (शांतता मंडळाच्या) सहकार्याने काम करेल. ‘बोर्ड ऑफ पीस’ हा उपक्रम ट्रम्प यांच्या गाझा युद्धविराम योजनेचाच एक भाग आहे.

दरम्यान, हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इस्रायलबरोबरचा हा संघर्ष संपवण्यासाठी करार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितलं की,”शांतता मंडळाने हमास आणि गाझामधील इतर सशस्त्र गटांच्या संपूर्ण निःशस्त्रीकरणासाठी एक करार केला आहे. युद्ध संपवण्याच्या २०-कलमी योजनेच्या अंमलबजावणीमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

करारात कोणत्या गोष्टींचा समावेश?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यांनुसार, या करारामुळे गाझाचा कारभार ‘शांतता मंडळा’च्या सहकार्याने काम करणाऱ्या एका नवीन पॅलेस्टिनी सरकारकडे सोपवण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच या करारातून इस्रायलला आवश्यक ती सुरक्षा मिळेल. तसेच यापुढे प्रदेशाचा वापर हल्ल्यांसाठीचा तळ म्हणून केला जाणार नाही.

हमासने करारासाठी सहमती कशी दर्शवली?

‘अल जझीरा’च्या एका वृत्तानुसार, कतार, तुर्की आणि इजिप्त या देशांनी मध्यस्थी करत हमासची चर्चा केली. त्यानंतर हमासने या करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शवली. मात्र, वाटाघाटींमध्ये शस्त्रे खाली ठेवण्याचा मुद्दा आधीपासून कळीचा मुद्दा मानला जात होता. पण आता हमास आपली शस्त्रे ‘आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दला’कडे सोपवण्यास सहमत झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यांनुसार, या कराराची अंमलबजावणी एका नियोजित टप्प्यांमध्ये करण्यात येईल. हमासकडून शस्त्रत्याग पूर्ण होताच इस्रायली सैन्य गाझामधून माघार घेईल आणि ‘शांतता मंडळ’ हे नवीन पॅलेस्टिनी पोलीस दलासोबत मिळून गाझाचे रहिवासी आणि शेजारील भागांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारेल.