अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती. ट्रम्प यांनी थेट ‘एआय’चं नाव बदललं आणि नव्या नावाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी देखील केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. ‘एआय’चं नाव आता ‘एसआय’ (SI) असं करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे.

यानंतर आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. ट्रम्प यांनी ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) शर्यतीत अमेरिकेला कायम आघाडीवर ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या उपक्रमाचं वर्णन औद्योगिक क्रांतीपेक्षाही मोठे आणि इंटरनेट क्रांतीपेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण पाऊल असं केलं आहे.

या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर सविस्तर भाष्य केलं आहे. ‘सुपर इंटेलिजन्स’च्या क्षेत्रात अमेरिकेचं जागतिक नेतृत्व टिकवून ठेवणं हे या फोर्सचं उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“‘सुपर इंटेलिजन्स’बाबत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानंतर आता मी ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’ (SIF) च्या स्थापनेची घोषणा करत आहे. ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’वर समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून आता ‘सुपर इंटेलिजन्स’च्या क्षेत्रात अमेरिकेचं जागतिक नेतृत्व कायम राखलं जाईल. तज्ज्ञांच्या मते ही क्रांती औद्योगिक क्रांती आणि इंटरनेटपेक्षाही मोठी ठरणार आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

“ही फोर्स ग्राहक, धार्मिक संस्था, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा पुरवणारे घटक आणि ‘सुपर इंटेलिजन्स’ कंपन्या यांच्याशी फेडरल सरकारच्या संवादाचा व सहकार्याचा समन्वय साधण्याचं काम करेल. त्यानंतर ही फोर्स मला म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आणि ‘चीफ ऑफ स्टाफ’ यांना अहवाल सादर करेल”, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

‘एआय’ आता कोणत्या नावाने ओळखलं जाणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एआय’चं नाव बदललं असून नव्या नावाच्या प्रस्तावावर काही दिवसांपूर्वी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी एआय (AI) चं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. ‘एआय’चं नाव आता ‘एसआय’ (SI) असं करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकेच्या प्रशासनात ‘एआय’चं नाव अधिकृतपणे बदलून ‘एसआय’ (सुपर इंटेलिजन्स) असं करण्यात आलं आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या शब्दाऐवजी ‘सुपर इंटेलिजन्स’ हा शब्द तंत्रज्ञानाची खरी ताकद आणि क्षमता अधिक प्रभावीपणे दर्शवत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे आता ‘एआय’ हे ‘एसआय’ या नावाने ओळखलं जाणार आहे.