Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मागील काही वर्षांत अनेकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. या हल्ल्यांच्या घटनांमधून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. आता शनिवारी (२५ एप्रिल) देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. वॉशिंग्टन येथील ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनरमध्ये गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या कार्यक्रमात अमेरिकेतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही अशा प्रकारची घटना घडल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. तसेच या हल्लेखोराला अटक देखील करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर किती वेळा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला? अमेरिकेत हल्ल्यांच्या घटना का वाढत आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे का? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.
व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर कार्यक्रमात काय घडलं?
व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या अंतर्गत शनिवारी रात्री (२५ एप्रिल २०२६) डिनर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्यासह अमेरिकेतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अचानक भीषण गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यामुळे या कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे सर्वजण सुखरूप आहेत. ही गोळीबाराची घटना घडली तेव्हा सभागृहात मोठे आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर लगेच डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेण्यात आलं. तसेच सुरक्षा रक्षकांच्या पथकाने या घटनेतील संशयित हल्लेखोराला अटक केली.
संशयित हल्लेखोर कोल टॉमस ॲलन कोण आहे?
व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर कार्यक्रमात गोळीबार करणारा संशयित हल्लेखोर हा कोल टॉमस ॲलन असल्याची माहिती समोर आली आहे. कोल टॉमस ॲलन असं या संशयिताचं नाव असून तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याची पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली?
‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन’च्या डिनर दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “वॉशिंग्टन डीसीमधील ही एक मोठी संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अप्रतिम काम केलं. त्यांनी अतिशय जलद आणि धैर्याने पावलं उचलली आहेत. तसेच संशयित हल्लेखोराला पकडण्यात आलं आहे. ही संध्याकाळ नियोजित वेळेपेक्षा खूप वेगळी होती आणि आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने करावा लागणार आहे.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वी किती वेळा प्राणघातक हल्ले झाले?
पेनसिल्व्हेनियामधील बटलरमधील घटनेत काय घडलं होतं?
मागील काही वर्षांत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या घटनांमधून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर १४ जुलै २०२४ रोजी सकाळी पेनसिल्व्हेनियामधील बटलर येथे जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. कार्यक्रमस्थळाच्या बाहेर उंच ठिकाणी लपून बसलेल्या हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेत ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेली होती. त्या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली होती. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांची निवडणूक रॅली सुरू होती. दरम्यान, त्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “देवाची कृपा म्हणूनच मी वाचलो.”
पेनसिल्व्हेनियामधील घटनेचा हल्लेखोर कोण होता?
पेनसिल्व्हेनियामधील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेतील हल्लेखोराची ओळख थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) असं पटली होती. तो पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्क येथील राहणारा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्याने हा हल्ला का केला? त्याच्याबरोबर आणखी कुणी होते की तो एकटाच होता? याचा तपास नंतर सुरक्षा रक्षकांकडून करण्यात आला होता. त्या घटनेनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावरील हल्ल्याचा निषेध केला होता.

ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना फेब्रुवारीत घडली होती. मात्र, सुरक्षा दलांच्या वेळीच लक्षात आलं आणि सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत संबंधित संशयित व्यक्ती ठार झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील ‘मार-ए-लागो’ या खासगी रिसॉर्टच्या सुरक्षेचं उल्लंघन करण्याचा आणि प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्याचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला होता. वृत्तानुसार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका तरुणाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो’ रिसॉर्टमध्ये बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेच अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात घुसखोरी करणारा संशयित तरुण ठार झाला होता. या घटनेमुळेही अमेरिकेत खळबळ उडाली होती. दरम्यान, अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्या तरुणाला शस्त्र खाली ठेवण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्या तरुणाने इंथनाची कॅन होती, तसेच हातात बंदूक होती. त्याने त्याच्याकडील शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिल्याने अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्याच्यावर गोळी झाडली होती आणि त्यात ती बंदुकधारी व्यक्ती ठार झाली होती.
घटनेवेळी डोनाल्ड ट्रम्प रिसॉर्टमध्ये उपस्थित नव्हते
‘मार-ए-लागो’ रिसॉर्ट परिसरात ही घटना घडली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामध्ये नव्हते. ते शनिवारी रात्री गव्हर्नर्सच्या डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टन डी.सी. या ठिकाणी गेले होते. तसेच घटनेच्या वेळी ‘मार-ए-लागो’ रिसॉर्ट येथे कोणीही व्हीआयपी उपस्थित नव्हतं. त्यामुळे अनर्थ टळला होता.
