Firing at Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या काही वर्षांमध्ये हल्ल्याच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यांमधून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावलेदेखील आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली असून त्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प एका कार्यक्रमानिमित्त वॉशिंग्टनमधील हिल्टन या आलिशान हॉटेलमध्ये एका डिनर पार्टीसाठी पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासमवेत उपस्थित होते. यावेळी एका हल्लेखोराने अचानक तिथे येत गोळीबार केला. यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ उडाला. शेवटी सुरक्षा पथकाने ट्रम्प यांना सुरक्षितपणे तिथून बाहेर नेलं. याप्रकरणी संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नेमका हल्ला कसा झाला?
डोनाल्ड ट्रम्प व मेलेनिया ट्रम्प हिल्टन हॉटेलमध्ये ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स असोसिएसन’कडून आयोजित केलेल्या डिनर पार्टीसाठी उपस्थित होते. हल्ल्यावेळच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प, मेलेनिया ट्रम्प व त्यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमात व्यासपीठावर बसल्याचं दिसत आहे. काही वेळानंतर ट्रम्प यांचा एक अधिकारी त्यांच्यामागे येऊन त्यांना व मेलेनिया यांना एका कागदावर लिहिलेला मजकूर दाखवत असताना समोर सभागृहात एकच गदारोळ झाला. ट्रम्प यांच्या बाजूला बसलेल्या महिला पदाधिकाऱ्याला अचानक झालेल्या गोंधळामुळे धक्का बसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसून येत आहे.
काही क्षणांत सभागृहात गोंधळ उडाला. त्यापाठोपाठ सभागृहात मोठे आवाज ऐकू आले. हे आवाज पाठोपाठ झाडण्यात आलेल्या गोळ्यांचे असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं. घडल्या प्रकारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सतर्क झाली व त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेलं. यानंतर सभागृहातील उपस्थित इतर लोकांनादेखील सुरक्षितपणे बाहेर नेण्यात आलं व सुरक्षा दलांनी हिल्टन हॉटेलचा ताबा घेऊन झाडाझडतीला सुरुवात केली.
Cole Tomas Allen नावाच्या संशयिताला अटक
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्लाप्रकरणी पोलिसांनी कोल टोमस अॅलन नावाच्या संशयित व्यक्तीला अटक केली आहे. फॉक्स न्यूज व नयू यॉर्क पोस्टच्या स्तंभलेखिका कॅरोल मार्कोविझ यांनी यासंदर्भात शेअर केलेल्या पोस्टमध्ये संबंधित संशयिताची ओळख स्प्ट केली आहे. कोल कॅलिफोर्नियाच्या टोरन्सचा रहिवासी असल्याचंदेखील त्यांनी नमूद केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सदर हल्ल्याबाबत नंतर माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. “या प्रसंगी सिक्रेट सर्व्हिस व सुरक्षा दलांनी अतिशय जलद आणि चोख काम केलं”, असं म्हणत त्यांनी सुरक्षा यंत्रणेचं कौतुक केलं. तसेच, या हल्ल्यात हल्लेखोराचं मुख्य लक्ष्य आपणच असल्याची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली. मात्र, यात इराणचा काही संबंध असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला. हल्ला करणारा हा एक विकृत व्यक्ती होता, असंदेखील त्यांनी नमूद केलं. या हल्ल्यामुळे उधळला गेलेला कार्यक्रम येत्या महिन्याभरात पुन्हा आयोजित केला जाईल आणि सदर घडामोडीबाबत लवकरच एक पत्रकार परिषद घेतली जाईल, असंही ते म्हणाले.
