मुस्लीम बहूल देशातील कट्टरतावादी लोकांना आणि निर्वासितांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने नातेवाईकांची ताटातूट झाली आहे. मुलगी अमेरिकेत तर आई इराकमध्ये, आई अमेरिकेत तर मुली इराकमध्ये अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आता अमेरिकेत आंदोलनही सुरु झाले आहे.

मुस्लीम लोकांचे अमेरिकेत होणारे स्थलांतर कमी करण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. त्याची पूर्तता त्यांनी आठवडाभरातच केली आहे. प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स या शीर्षकाच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. या निर्णयामुळे अमेरिकी शरणार्थी कार्यक्रम या आदेशामुळे आपोआप बंद झाला आहे. ज्या देशांची नावे ट्रम्प प्रशासनाने घेतली आहेत त्यांच्या शरणार्थीना आता किमान सुरुवातीला १२० दिवस प्रवेश मिळणार नाही. अनेक देशात युद्ध व संघर्ष, नागरी युद्ध सुरू आहे त्याचा फायदा घेऊन दहशतवादी अमेरिकेत घुसू शकतात अशी भीती आदेशात व्यक्त केली आहे.

अमेरिकेत या आदेशाची अंमलबजावणी झाली असून शनिवारी पाच इराकी आणि येमेनमधील एका नागरिकाला विमानतळावरच रोखण्यात आले. या सर्वांना मायदेशीही पाठवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी विमानतळावरच या देशातून आलेल्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना पुन्हा मायदेशी पाठवले जाईल असे अधिका-यांनी सांगितले. तर या निर्णयामुळे कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. इराकमधून आलेल्या दोन बहिणी गेल्या ५ ते ६ वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. ‘आमच्याकडे ग्रीन कार्डही आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या आईलादेखील व्हिसा मंजूर झाला होता. आई अमेरिकेत येत असतानाच ट्रम्प यांनी निर्णय जाहीर केल्याने आईला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले’ अशी माहिती एका तरुणीने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. असाच काहीसा अनुभव अनेकांना येत आहे. एका तरुणाचे मार्चमध्ये होणारे लग्नही अडचणीत आले आहे. माझ्या लग्नाची तयारी सुरु होती. पण आता आम्हाला लग्न पुढे ढकलावे लागेल असे एका तरुणाने सांगितले. या तरुणाची होणारी पत्नी इराकमध्ये राहते.

अमेरिकेतील जेडब्ल्यूएफ विमानतळाबाहेर हजारो नागरिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. अमेरिकेत निर्वासितांचे स्वागत आहे असे फलक हाती घेऊन या आंदोलकांनी ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. ट्रम्प यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही आता सामाजिक संघटनांनी केली आहे.  दरम्यान, ट्रम्प यांच्या निर्णयाचा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीदेखील विरोध दर्शवला आहे. आम्ही ट्रम्प यांच्या निर्णयाची असहमत आहोत असे या दोघांनी म्हटले आहे. तर अॅपलचे सीईओ टीम कुक यांनीदेखील या निर्णयाचा विरोध दर्शवला आहे.