Niranjan Hiranandani comment on Donald Trump: शांततेचा नोबेल मिळावा म्हणून आटापिटा करणारे, पाकिस्तानसारख्या देशाला स्वतःची भलामण करायला भाग पाडणारे आणि भारताने नोबेलसाठी पाठिंबा दिला नाही म्हणून रुसून बसणारे डोनाल्ड ट्रम्प अनेकदा वादग्रस्त विधाने करतात. नुकतेच त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना उचलून थेट अमेरिकेत आणले. आता त्यांची नजर इतर राष्ट्रांवर आहे. जगात सध्याच्या घडीला सर्वशक्तीमान असलेल्या ट्रम्प यांचाही एक दिवस अंत होईल, असे विधान भारतातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांनी केले आहे.

निरंजन हिरानंदानी यांनी आज तक वृत्तवाहिनीच्या मुंबई मंथन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. मुंबईत जन्म झाला असल्यामुळे इथल्या पायाभूत सुविधांबाबत हिरानंदानी यांनी आपले विचार मांडले.

या मुलाखतीच्या शेवटी त्यांना मुंबई व्यतिरिक्त जगातील इतर प्रश्नांबाबत विचारण्यात आले. यात एक प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे काय करायचे? ते भारतासमोर अडचणी निर्माण करत आहेत, असा प्रश्न निवेदकाने विचारला.

डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनले आहेत

या प्रश्नावर उत्तर देताना व्यावसायिक निरंजन हिरानंदानी म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प सध्या हिटलरसारखे वागत आहेत. जगावर नियंत्रण मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. हिटरलदेखील युद्ध युद्ध करत होता. ट्रम्पही तेच करत आहेत. पण यांचे युद्ध वेगळे आहे. त्यावेळी हिटलरला साथ देणाऱ्या देशांचे नुकसान झाले. एकदिवस त्यांच्याबरोबर आपल्यासह सर्वांनाच युद्ध करावे लागेल.”

हिरानंदानी पुढे म्हणाले, ट्रम्प जगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीयदृष्ट्या अमेरिका नक्कीच आजच्या घडीला सर्वात शक्तीशाली देश आहे. या शक्तीशाली देशाचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे ते दुसऱ्या देशातील राष्ट्राध्यक्षाला उचलून आणत आहेत. पण एकाअर्थाने हे युद्धच आहे. त्याला कुणी मान्यता दिली काय किंवा नाही काय, पण त्यांनी व्हेनेझुएलाविरोधात युद्धच छेडले आहे.

गीतेच्या तत्वज्ञानाचा दिला हवाला

“पाश्चिमात्य देश हे स्वीकारत नाहीयेत. पण पुढच्या महिन्यात बहुतेक ते (ट्रम्प) ग्रीनलँड घेतील. त्यानंतर कोलंबियाकडे वळतील. चौथ्या महिन्यात दुसऱ्या कोणत्यातरी देशाकडे त्यांची नजर पडेल. रशियन टँकरला काल रात्री त्यांनी नियंत्रित केले. पुढील काळात आणखी काही करतील. पण जेव्हा ते लक्ष्मण रेषेच्या पलीकडे जातील, तेव्हा कळेल”, असे सांगून हिरानंदानी यांनी गीतेतील तत्वज्ञानाचा हवाला दिला.

ते म्हणाले, “जेव्हा एखादा व्यक्ती लक्ष्मण रेषा ओलांडतो तेव्हा त्याचा सर्वनाश होतो, हा पाठ आपल्याला गीतेतूनही मिळतो. एक ना एक दिवस हे होईलच. रामलीलामध्ये दाखवलेली लक्ष्मण रेषा ट्रम्प यांनी अद्याप ओलांडलेली नाही. पण सहा महिने जाऊद्या, दिवाळीच्या आधी हे होऊन जाईल. तुम्ही सर्व वाट पाहा.”