अमेरिका-इराण युद्धामध्ये एकीकडे इराणची आण्विक कार्यक्रमावरून भूमिका अद्याप ताठर असताना दुसरीकडे अमेरिका-इस्रायलमध्येच बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यामध्ये फोनवर तणावपूर्ण चर्चा झाल्याचे आणि अमेरिकेने इराणकडे पुन्हा शांततेचा नवा प्रस्ताव पाठविल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिका-इराणमध्ये शांततेची चर्चा सुरळीत व्हावी, यासाठी पाकिस्तानने पुन्हा कंबर कसली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यामध्ये तणावपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त अमेरिकेच्या ‘ॲक्सिऑस’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ट्रम्प यांच्याबरोबर फोनवर बोलणे झाल्यानंतर नेतान्याहू संतापले होते; तसेच इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याऐवजी लवकरात लवकर शांतता करार करण्याकडे अमेरिकेचा कल असल्याचे वृत्तात म्हटले आहे. याउलट, नेतान्याहू इराणवर पुन्हा हल्ले करून इराणची लष्करी क्षमता क्षीण करून पायाभूत सुविधा नष्ट कराव्यात, यावर ठाम आहेत.
ट्रम्प यांनी अरब देशांच्या विनंतीवरून इराणवरील हल्ले पुढे ढकलल्याचे रविवारी जाहीर केले होते. ट्रम्प शांतता कराराच्या बाजूने असले, तरी करार होणार नसेल, तर युद्ध पुन्हा सुरू करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, दोन्ही देश शांतता करारावर सही करण्याच्या आणि युद्ध पुन्हा सुरू करण्याच्या सीमारेषेवर असल्याचेही म्हणाले होते. दरम्यान, समृद्ध युरेनियम इराणच्या बाहेर जाता कामा नये, अशा सूचना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. अमेरिकेशी शस्त्रसंधी केल्यापासून इराण पुन्हा ड्रोन उत्पादन आणि लष्करी क्षमता वाढवत असल्याचे अमेरिकी माध्यमाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या नव्या प्रस्तावाचा इराणकडून आढावा
कतार आणि पाकिस्तानने इतर मध्यस्थांच्या मदतीने शांततेचा नवा प्रस्ताव तयार केला असून, अमेरिका आणि इराणमध्ये समेट होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. अमेरिकेने इराणला शांततेचा नवा प्रस्ताव दिला असून, इराण त्याचा आढावा घेत आहे. इराणने ठेवलेल्या १४ मुद्द्यांच्या आधारे चर्चा सुरू असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
क्युबात हस्तक्षेप करण्याची धमकी
क्युबाचे माजी अध्यक्ष रॉल कॅस्ट्रो हे १९९६मध्ये मियामीस्थित निर्वासित क्युबन नागरिकांना घेऊन उड्डाण करणारे एक नागरी विमान पाडण्याच्या गुन्ह्यत दोषी असल्याचे अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यानंतर, ‘‘क्युबामध्ये हस्तक्षेप करण्याचा अनेक अमेरिकी अध्यक्षांनी गांभीर्याने विचार केला होता, मात्र ते काम करणारा मीच असेन,’’ असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केले.
मला योग्य उत्तरे मिळाली नाहीत, तर युद्ध पुन्हा हल्ले केले जातील. युद्धासाठी आम्ही पूर्ण तयार आहोत. हल्ले लगेच सुरू होतील. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
