US-Iran Peace Deal: गेल्या चार आठवड्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धावर आता तोडगा काढण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष थांबवण्यासाठी इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रस्तावातील काही जाचक अटी इराणला मान्य होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच आता इराणकडून अमेरिकेच्या या १५ कलमी शांतता प्रस्तावावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
इराणने युरेनियमचं संवर्धन थांबवावं, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न बंद करावेत, अशा विविध १५ अटी अमेरिकेने ठेवलेल्या आहेत. पण अमेरिकेच्या या अटी इराणने बुधवारी फेटाळून लावत पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी स्वतःचा पाच कलमी युद्धविराम प्रस्ताव जारी केला आहे. या प्रस्तावात युद्धात झालेली नुकसान भरपाई आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर सार्वभौमत्वाच्या मागणीसह आदी अटींचा समावेश आहे. या संदर्भातील वृत्त इराणच्या सरकारी टीव्हीच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
वृत्तानुसार, ‘तेहरानचा आग्रह आहे की संघर्षाचा शेवट केवळ तेहरानच्या स्वतःच्या अटींवर आणि वेळेनुसारच होईल. जेव्हा इराण स्वतः ठरवेल आणि जेव्हा त्याच्या स्वतःच्या अटी पूर्ण होतील तेव्हाच इराण हे युद्ध संपवेल’, असं या अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
इराणने कोणत्या पाच अटी ठेवल्या?
-युद्धातील नुकसान भरपाईची हमी.
-आक्रमण आणि हत्या तात्काळ थांबवणं.
-इराणविरुद्ध युद्धाची पुनरावृत्ती रोखणारी ठोस हमी.
-इराणविरुद्ध संपूर्ण प्रदेशातील सर्व प्रतिकार गटांविरुद्धच्या युद्ध समाप्ती.
-होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
अमेरिकेने इराणसमोर कोणते मुद्दे मांडले आहेत?
अमेरिकेन सर्वात महत्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्यास त्या बदल्यात तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्याला मदतही केली जाईल असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे.
अमेरिकेच्या १५ कलमी शांतता प्रस्तावातील ५ महत्वाचे मुद्दे कोणते?
-इराण समर्थन देणाऱ्या बंडखोरांना अप्रत्यक्ष रणनीती आणि या गटांना निधी व शस्त्रे पुरवणं थांबवावं.
-नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणुसुविधा देखील इराणने बंद कराव्यात.
-इराणच्या क्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि त्यांचा वापर मर्यादित करावा.
-इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
-होर्मुझ खुली केल्यास तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्यांना मदतही केली जाईल.
शांतता चर्चेसाठी पाकिस्तानची मध्यस्थी
दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. यासाठी शाहबाज शरीफ यांनी एक पोस्ट देखील एक्सवरुन केली होती, त्याचा स्क्रिनशॉट खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला. आता या चर्चेतून दोन्ही देशांतील संघर्ष समाप्त होणार की दोन्ही देशांनी मांडलेल्या अटींवरुन या चर्चा फिसकटणार याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. शिवाय शांतता चर्चेच्या यजमानपदी असणाऱ्या पाकिस्तानची यात काय भूमिका असेल याकडेही लक्ष लागलं आहे.
