Russin Crude Oil : अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण इराण हादरलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराणने अमेरिका आणि इस्रायवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केल्यामुळे हे युद्ध आणखी भडकलं आहे. या युद्धाच्या झळा आता जगातील अनेक देशांना बसत असून तेलाच्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत.
यातच तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्यामुळे जागतिक व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. याचा फटका भरतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे शेकडो रशियन तेल टँकर समुद्रात अडकले आहेत. आता भारत हेच रशियन तेल टँकर खरेदी करण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतला असून समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून ३० दिवसांची सूट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेवरील वाढलेला दबाव कमी करण्यासाठी समुद्रात अडकलेले रशियन तेल टँकर भारताला विकण्यासाठी ३० दिवसांसाठी सूट देण्यात आल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
या वृत्ताला दुजोरा देताना अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं की, “भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी अमेरिका भारताला रशियन तेल खरेदी करण्यास ३० दिवसांची सूट देत आहे. ही तात्पुरती सूट फक्त समुद्रात असलेल्या कार्गोना लागू होईल आणि मॉस्कोला आर्थिकदृष्ट्या फारसा फायदा होणार नाही. यामुळे जागतिक तेल बाजारपेठेवर वाढलेला दबाव कमी कमी होईल”, असं स्कॉट बेसेंट यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं.
President Trump’s energy agenda has resulted in oil and gas production reaching the highest levels ever recorded.
— Treasury Secretary Scott Bessent (@SecScottBessent) March 6, 2026
To enable oil to keep flowing into the global market, the Treasury Department is issuing a temporary 30-day waiver to allow Indian refiners to purchase Russian oil.…
इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने व्यापार ठप्प?
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने कब्जा मिळवला असल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केला. या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातील असा इशारा इशारा दिला. मात्र, इराणच्या या दाव्याचं अमेरिकेनं खंडन केलं. यूएस सेंट्रल कमांडचे अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी इराणचा दावा खोडून काढला. सर्व इराणी नौदल बुडवले असून १७ इराणी जहाज नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला. “अनेक दशकांपासून इराणी राजवटीने आंतरराष्ट्रीय जहाजांना त्रास दिला. आज अरबी आखात, होर्मुझची सामुद्रधुनी किंवा ओमानच्या आखातात एकही इराणी जहाज जात नाही”, असं अमेरिकेने म्हटलं.
