Donald Trump On Mojtaba Khamenei : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात गेल्या आठवड्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर या युद्धामध्ये आतापर्यंत शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबण्याची शक्यता दिसत नाही.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आज इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांची निवड होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक भाष्य केलं आहे. ‘मी खूश नाही’, असं म्हणत अगदी दोन शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणचा पराभूत राष्ट्र म्हणून उल्लेख

दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत बोलताना इराणचा पराभूत राष्ट्र म्हणून उल्लेख केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “इराणने मध्यपूर्वेतील शेजारी राष्ट्रांची माफी मागितली आहे आणि शरणागती पत्करली असून वचन दिलंय की इराण आता त्यांच्यावर गोळीबार करणार नाही. इराणने हे आश्वासन फक्त अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यामुळेच दिलं. अन्यथा ते मध्यपूर्वेवर ताबा मिळवून राज्य करू इच्छित होते. मागच्या काही वर्षांत पहिल्यांदा इराणला त्याच्या शेजारील मध्य पूर्वेकडील देशांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मध्य पूर्वेकडील काही राष्ट्रांनी मला म्हटलं की, धन्यवाद अध्यक्ष. इराण आता मध्य पूर्वेचा दादा राहिलेला नाही तर मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र बनलं आहे आणि तो शरण येईपर्यंत अनेक दशकं इराण असंच पराभूत राष्ट्र राहील किंवा कदाचित पूर्णपणे कोसळेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोण आहेत?

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचेच सुपूत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेली ३६ वर्षे खामेनी यांनी इराणवर राज्य केलं. आता त्यांचा मुलगा मोजतबा यांच्याकडे देशातील सर्वोच्च पद आलं आहे. इराणची शक्तिशाली धार्मिक संस्था ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने (तज्ज्ञांची परिषद) मोजतबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद येथे झाला. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी त्यांचे वडील सक्रिय होते, त्या काळात ते लहानाचे मोठे झाले. मोजतबा यांना उच्च दर्जाचे धार्मिक विद्वान मानले जात नाही. त्यांनी कधीही कोणतेही निर्वाचित पद भूषवलेले नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक सरकारी पद नाही. असं असूनही, पडद्यामागून त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. विशेषतः शक्तिशाली ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत.

इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनींच्या निवडीवर रशियाने काय म्हटलं?

मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी प्रतिक्रिया देत मोजतबा खामेनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलं की, “तेहरानला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल आणि आमच्या इराणी मित्राबरोबर आम्ही पुन्हा एकदा एकजुट असल्याचं व्यक्त करतो,” असं पुतिन यांनी म्हटलं.