Donald Trump On US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरू असून या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. इराण आता अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत असून इराणने यूएईच्या अनेक शहरात हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता असून संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. मात्र, असं असतानाच आज इराणच्या अध्यक्षांनी आखाती राष्ट्रांची माफी मागितली.

इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तसेच जोपर्यंत इतर देशातून हल्ले होणार नाहीत तोपर्यंत इराणही हल्ले करणार नाही अशी भूमिका घेत शेजारी असलेल्या मुस्लीम राष्ट्रांची माफी मागितली. दरम्यान, इराणच्या अध्यक्षांनी आखाती राष्ट्रांची माफी मागितल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं.’इराण आता पराभूत राष्ट्र आहे’, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर टीका केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“इराणने मध्यपूर्वेतील शेजारी राष्ट्रांची माफी मागितली आहे आणि शरणागती पत्करली आहे. तसेच वचन दिलं आहे की इराण आता त्यांच्यावर गोळीबार करणार नाही. मात्र, इराणने हे आश्वासन फक्त आणि फक्त अमेरिका, इस्रायलच्या अथक हल्ल्यामुळेच दिलं. अन्यथा ते मध्यपूर्वेवर ताबा मिळवून राज्य करू इच्छित होते. मागच्या हजारो वर्षांत इराणला त्याच्या शेजारील मध्य पूर्वेकडील देशांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मध्य पूर्वेकडील काही राष्ट्रांनी मला म्हटलं की,’धन्यवाद अध्यक्ष. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, तुमचं स्वागत”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटलं.

‘इराण आता पराभूत राष्ट्र…’

“इराण आता मध्य पूर्वेचा दादा राहिलेला नाही तर मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र बनलं आहे आणि तो शरण येईपर्यंत अनेक दशकं इराण असंच पराभूत राष्ट्र राहील किंवा कदाचित पूर्णपणे कोसळेल. आज इराणवर मोठा हल्ला होईल. इराणच्या वाईट वर्तनामुळे ज्या क्षेत्रांना आणि लोकसंख्येला आतापर्यंत लक्ष्य मानलं जात नव्हतं, त्यांनाही विनाश किंवा मृत्यूचा धोका निर्माण झाला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Donald Trump On Israel Iran War

इराणने मागितली आखाती राष्ट्रांची माफी

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असं युद्ध भडकलं असताना आता इराणच्या अध्यक्षांनी मोठं पाऊल उचललं आहे. इराणने शेजारी असलेल्या मुस्लीम राष्ट्रांची माफी मागत क्षेपणास्त्र हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली. इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी टीव्हीवर केलेल्या भाषणात म्हटलं की, इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत इतर देशातून हल्ले होणार नाहीत, तोपर्यंत इराणही हल्ले करणार नाही.

पेझेश्कियान म्हणाले, मी शेजारच्या देशांची माफी मागतो. इतर देशांवर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तथापि अमेरिका आणि इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नाही, असेही पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले. “इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, अशी इच्छा शत्रूंनी व्यक्त केली. त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्या थडग्यात पुरली जाईल”, असेही पेझेश्कियान म्हणाले.