Donald Trump On Cuba : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले केल्यामुळे युद्ध भडकलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराण देखील अमेरिका आणि इस्रायवर जोरदार प्रतिहल्ले करत आहे. या युद्धाच्या झळा जगातील अनेक देशांना बसत असून जागतिक तेल व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. असं असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध सुरू असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं वक्तव्य करत क्यूबा देशाला धमकी दिली आहे. ‘आम्हाला आधी हे युद्ध (इराणशी) संपवायचं आहे, मग त्यानंतर जास्त वेळ लागणार नाही, जेव्हा अमेरिकेचं लक्ष क्यूबाच्या दिशेने असेल’, असा सूचक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी क्यूबाला दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या युद्धाचा संदर्भ म्हटलं की, “आम्हाला हे युद्ध आधी संपवायचं आहे. मात्र, त्यानंतर अमेरिकेचं लक्ष क्युबाकडे वळण्यास फार वेळ लागणार नाही”, असा सूचक इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी असंही म्हटलं की, क्युबा अमेरिकेशी करार करू इच्छित आहे आणि भविष्यात तेथे राहणारे बरेच लोक त्यांच्या देशात परत येऊ शकतात.

ट्रम्प यांनी याआधीही क्यूबाला दिली होती धमकी

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना काही दिवसांपूर्वी अटक केलं. व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबिया आणि क्यूबाला लष्करी कारवाईची धमकी दिली होती. ‘क्युबाने खूप उशीर होण्यापूर्वी अमेरिकेशी करार करावा, अन्यथा त्यांचा तेल आणि पैशाचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियालाही दिली होती धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना कोलंबियाच्या सरकार विरुद्ध थेट लष्करी कारवाईची धमकी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “कोलंबिया देखील खूप आजारी आहे. ज्यावर एका आजारी व्यक्तीचं राज्य आहे, ज्याला कोकेन बनवायला आणि ते अमेरिकेला विकायला आवडतं. मात्र, ते तो जास्त काळ करू शकणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.