Donald Trump On Vladimir Putin : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत. गेल्या जवळपास १४ दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही जोरदार प्रतिहल्ले करत असल्यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

एवढंच नाही तर होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्याने तेलाच्या जहाजांच्या वाहतुकीला अडथळे येत आहेत. व्यापारी जहाजांवर हल्ले होत असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणला धमकी देणारे विधाने करत आहेत.

पुढील आठवड्यात इराणवर आणखी जोरदार हल्ला करण्याची योजना असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच म्हटलं आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘इराणला कदाचित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मदत करत असतील’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

“मला वाटतं की ते (व्लादिमीर पुतिन) कदाचित त्यांना (इराणला) थोडीशी मदत करत असतील. हो मला असं वाटतं. कारण त्यांना (रशियाला) कदाचित असं वाटतं की आम्ही युक्रेनला मदत करत आहोत. बरोबर ना”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूज रेडिओच्या मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे.

इराणमधील राजवट बदलण्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की, “मला खरोखर वाटतं की त्यांच्याकडे शस्त्र नाहीत, त्यांच्यासाठी हा एक मोठा अडथळा आहे. मला वाटतं की हा एक खूप मोठा अडथळा आहे. ते (राजवट बदल) होईल, पण कदाचित लगेच नाही”, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणवर आणखी मोठा हल्ला करण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, गरज पडल्यास अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढेल. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हे युद्ध यशस्वी होईल. तसेच पुढील आठवड्यात इराणवर आणखी मोठा हल्ला करण्याची अमेरिकेची योजना आहे, असं भाष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं.

‘इराण शरणागती पत्करण्याच्या तयारीत’, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांची ११ मार्च रोजी जी ७ नेत्यांबरोबर व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत मोठा दावा केला. इराण शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे, असं त्यांनी म्हटलं. इराण शरणागती पत्कारण्याच्या तयारीत असल्याचा दावा करताना त्यांनी असंही सुचवलं की तेहरानमध्ये असा कोणताही अधिकारी जिवंत राहिलेला नाही ज्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती असेल. “नेता कोण आहे हे कोणालाही माहिती नाही, त्यामुळे कोणीही आत्मसमर्पणाची घोषणा करू शकत नाही”, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इस्रायलचा मोजतबा खामेनींना इशारा

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना इशारा दिला. खामेनी यांच्यासाठी कुठलाही ‘लाईफ इन्शुरन्स’ नाही, असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. इस्रायल मोजतबा खामेनी किंवा हिजबुल्लाचे नेते नईम कासिम यांना लक्ष्य करणार का? या प्रश्नावर बोलताना नेतन्याहू यांनी ही शक्यता नाकारता येणार नाही असं उत्तर दिलं. “दहशतवादी संघटनांच्या कोणत्याही नेत्याच्या आयुष्याबाबत (Life Insurance Policy) मी कोणतीही शाश्वती किंवा हमी देणार नाही.” असं नेतान्याहू म्हणाले.