Donald Trump On US-Iran Peace Deal : अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या काही नेत्यांचा आणि लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा या युद्धात मृत्यू झाला, तरीही हे युद्ध अद्याप थांबलेलं नाही. पण आता हे युद्ध थांबवण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला. मात्र, अमेरिकेचा हा प्रस्ताव इराणने गुरुवारी पुन्हा एकदा फेटाळून लावला. ‘अमेरिकेचा हा प्रस्ताव एकतर्फी आणि अन्यायकारक असून केवळ अमेरिका-इस्रायलच्या हिताचा आहे’, असं इराणने म्हटलं आहे.

दरम्यान, इराणने अमेरिकेचा शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘इराणी लढवय्ये म्हणून कमकुवत आहेत, पण वाटाघाटींमध्ये उत्तम आहेत’, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लढाऊ दृष्ट्या कमकुवत, पण वाटाघाटींमध्ये उत्तम असल्याचं म्हटलं आहे. तसेच इराण वाटाघाटींसाठी दबाव आणत असल्याचा दावा करत अमेरिका राजनैतिक तोडगा काढण्यास उत्सुक असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आणि हा दबाव तेहरानकडून येत असल्याचं भाष्य केलं.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “ते (इराण) करार करण्यासाठी विनवणी करत आहेत, आम्ही नाही. संघर्ष चौथ्या आठवड्यात पोहोचला असताना अमेरिका नव्हे तर इराणच वाटाघाटी पुन्हा सुरू करू पाहत आहेत, असं ते (इराण) बोलत आहेत हे कोणालाही कळेल. ते मूर्ख नाहीत, खरं तर एका अर्थाने ते खूप हुशार आहेत आणि ते उत्तम वाटाघाटी करणारे आहेत. मी तर म्हणेन की, ते (इराण) लढवय्ये म्हणून कमकुवत आहेत. पण वाटाघाटींमध्ये उत्तम वाटाघाटी करणारे आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

शांतता चर्चेसाठी पाकिस्तानची मध्यस्थी

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. यासाठी शाहबाज शरीफ यांनी एक पोस्ट देखील एक्सवरुन केली होती, त्याचा स्क्रिनशॉट खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला. आता या चर्चेतून दोन्ही देशांतील संघर्ष समाप्त होणार की दोन्ही देशांनी मांडलेल्या अटींवरुन या चर्चा फिसकटणार याकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.